जळगाव- शहरासह जिल्ह्यात तापमानाचा कहर सुरुच आहे. गेल्या आठवडाभरातील तापमानाची आकडेवारी पाहता जिल्ह्यात सरासरी तापमान ४४ अंशांपर्यंत गेले आहे. जून महिन्याला सुरुवात झाली असली तरी तापमान कमी होत नसल्याने जळगावकरांच्या जिवाची काहिली होत आहे.
गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यातील तापमान ४४ ते ४५ अंशादरम्यान स्थिर आहे. सकाळी ८ वाजल्यापासूनच उकाडा जाणवतो. तर सकाळी १० पर्यंत तापमानाचा पारा ४० अंशावर जातो. दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान सर्वात जास्त तापमान असते. या काळात घराबाहेर पडणेही मुश्किल होते. रात्री ९ वाजेपर्यंत तापमान ३८ ते ४० अंश इतके राहत असल्याने नागरिकांना उष्णता असह्य होत आहे.
जळगाव जिल्ह्यात दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस तापमान कमी होण्यास प्रारंभ होतो. परंतु, यावर्षी जून महिना सुरू होऊनही तापमान कमी होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. मान्सून लांबण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून तापमान अजून काही दिवस तरी कमी होणार नाही, अशी चिन्हे दिसत आहेत.