जळगाव - जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वदूर सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. गुरुवारी दुपारपर्यंत जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये 39.40 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामाच्या दृष्टीने हा पाऊस खूपच लाभदायी ठरणार असल्याने बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
गुरुवारी सकाळी 7 वाजेपासूनच जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली होती. जळगाव शहरात सकाळी 9 वाजेच्या सुमारास दमदार पाऊस सुरू झाला होता. त्यानंतर दुपारी दोन अडीच वाजेपर्यंत पाऊस पडत होता. पावसामुळे शहरातील नवीपेठ, गोलाणी मार्केट, बजरंग बोगदा, वाघनगर, हरिविठ्ठलनगर, पिंप्राळा उपनगर, शिवधाम परिसर, बिबा पार्क यासारख्या सखल भागात पाणी साचले होते. पिंप्राळा उपनगर, वाघनगर याठिकाणी अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते.
जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड, यावल, रावेर, चोपडा या तालुक्यांमध्येही जोरदार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचून कापूस, ज्वारी, मका, सोयाबीन तसेच उडीद-मूग यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावल तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळामुळे केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे. भडगाव तालुक्यात देखील काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या पावसाची नोंद.. (कंसात 1 जूनपासून पडलेला पाऊस)
1) जळगाव - 35.53 मिमी (294.35 मिमी)
2) जामनेर - 30.10 मिमी (303.10 मिमी)
3) भुसावळ - 41.60 मिमी (236.85 मिमी)
4) बोदवड - 51.33 मिमी (274.25 मिमी)
5) मुक्ताईनगर - 61.50 मिमी (297.30 मिमी)
6) पाचोरा - 19.71 मिमी (273.49 मिमी)
7) भडगाव - 20.00 मिमी (300.50 मिमी)
8) एरंडोल - 34.25 मिमी (225.75 मिमी)
9) धरणगाव - 45.80 मिमी (278.43 मिमी)
10) पारोळा -27.50 मिमी (263.30 मिमी)
11) रावेर - 31.42 मिमी (306.58 मिमी)
12) यावल - 72.33 मिमी (269.67 मिमी)
13) अमळनेर - 40.38 मिमी (361.84 मिमी)
14) चोपडा - 72.85 मिमी (414.64 मिमी)
15) चाळीसगाव - 6.71 मिमी (327.33 मिमी)
जळगाव जिल्हा - 39.40 मिमी (295.16 मिमी)