जळगाव - जिल्ह्यात सध्या कडाक्याचे उन्ह पडत असल्यामुळे 'मे हिट'ची अनुभूती येत आहे. जिल्ह्याच्या तापमानामध्ये सतत वाढ होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानाने उच्चांक गाठला असताना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उष्णतेची लाट आली आहे.
शहरात सोमवारी ४४.६ इतके तापमान नोंदवण्यात आले. आगामी तीन दिवस जिल्ह्यासह शहरात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे वेगवान वाऱ्यांसह उष्णतेच्या झळा कायम राहणार आहेत.
जिल्ह्यात २६ ते २८ मे दरम्यान उष्णतेची लाट कायम राहणार आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांना आगामी तीन दिवस तापदायक ठरणार आहे. सोमवारी सकाळपासूनच तापमानात मोठी वाढ झाली होती. कडक उन्हामुळे रस्त्यांवर शुकशुकाट पाहावयास मिळाला. रविवारी शहराचे तापमान ४५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. हे तापमान यावर्षाचे उच्चांकी तापमान ठरले. रविवारच्या तुलनेत सोमवारी तापमानाचा पारा काही अंशी घसरला असला तरी उन्हाच्या झळा जाणवत होत्या. त्यामुळे प्रचंड उकाडा होत होता. २० किमी वेगाने वाहत आहेत.
वारे-उष्णतेची लाट कायम असताना, दुसरीकडे शहरात गेल्या तीन दिवसांपासून २० किमी प्रतितास वेगाने उष्ण वारे वाहत आहेत. यामुळे घरात थांबणे देखील कठीण झाले आहे. आठवडाभर उष्ण वारे वेगाने वाहणार असल्याने घरातून बाहेर निघणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. लॉकडाऊन असल्याने नागरिक घरातच थांबून आहेत. त्यामुळे सुदैवाने यंदा आतापर्यंत उष्माघाताचा एकही मृत्यू झालेला नाही.
३१ मेनंतर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज-जिल्ह्यात अजून चार ते पाच दिवस तापमानाचा पारा जास्त राहणार आहे. त्यानंतर ३१ मे नंतर जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची स्थिती तयार होऊन, सायंकाळच्या सुमारास वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
- विविध ठिकाणी झालेली तापमानाची नोंद-
भारतीय हवामान खाते (आयएमडी) - ४४.६
स्कायमेट - ४५ अंश सेल्सिअस
अॅक्यूवेदर - ४६ अंश सेल्सिअस
वेलनेस वेदर - ४५.६ अंश सेल्सिअस - आगामी पाच दिवसाचा अंदाज -
२६ मे - ४५ अंश सेल्सिअस
२७ मे - ४६ अंश सेल्सिअस
२८ मे - ४५ अंश सेल्सिअस
२९ मे - ४७ अंश सेल्सिअस
३० मे - ४५ अंश सेल्सिअस