जळगाव - शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात भाजपाने 1 नोव्हेंबर रोजी भव्य मोर्चाची हाक दिली आहे. याच मुद्द्यावरून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज (शुक्रवारी) भाजपाला जोरदार चिमटा काढला. 'कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाला विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावता आलेली नाही. त्यामुळे आता भाजपाने प्रॅक्टिस म्हणून मोर्चा काढायलाच हवा. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्यासाठी त्यांनी हा मोर्चा योग्य नियोजनात काढावा', अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपाला टोला लगावला आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आढावा बैठकीतील मुद्दे, भाजपाचा प्रस्तावित मोर्चा, जिल्हा बँक निवडणूक अशा विषयांवर मते मांडली.
भाजपाने प्रॅक्टिस तर करायलाच हवी ना?
भाजपाच्या मोर्चाबद्दल बोलताना मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, भाजपा शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या नावाने मोर्चा काढत आहे. पण त्या मोर्चाची फलश्रुती काय आहे? कारण ज्या कारणांसाठी ते मोर्चा काढत आहेत, त्या मागण्या राज्य सरकारने आधीच पूर्ण केल्या आहेत. भाजपाने मोर्चा जरूर काढायला हवा. कारण त्याशिवाय त्यांना बरे वाटणार नाही. बऱ्याच दिवसांपासून कोरोनामुळे ते शांत होते. त्यांनी मोर्चा काढायची प्रॅक्टिस करायलाच हवी. त्यांचा मोर्चा हा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्यासाठी असेल, असे सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार टोला लगावला.
हा तर भाजपाचा कांगावा -
राज्य सरकारने शेती नुकसानीच्या मदतीपासून जळगाव जिल्ह्याला वगळले, असा कांगावा भाजपाने केल्याचा आरोपही मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. मंत्रिमंडळात गुलाबराव पाटील असताना आपल्या जिल्ह्याला वगळण्याची कुणाची हिंमत आहे का? राज्य सरकारने दोन टप्प्यात मदत जाहीर केली होती. त्यामुळे दुसऱ्या यादीत जळगावचा समावेश होणारच होता, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. एमएसईबीच्या मुद्द्यावरून देखील भाजपा नेत्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली. राज्य सरकार शेतकऱ्यांना कृषी पंपांची चार बिले भरायला लावत असल्याचे भाजपा नेते सांगत होते. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना चालू महिन्याचे एकच बिल, जे 3 ते 4 हजार रुपये असते तेवढेच भरावे लागणार आहे. आज अनेक शेतकऱ्यांचे कनेक्शन पूर्ववत सुरू झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा बँकेत आजही सर्वपक्षीयसाठी आग्रही-
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल गठीत करण्याबाबत अपयश आले का? अशी विचारणा पत्रकारांनी केली असता गुलाबराव पाटील म्हणाले की, सहकारात राजकारण नको यासाठी, पालकमंत्री म्हणून आपण जिल्हा बँकेत सर्वपक्षीय पॅनलसाठी पुढाकार घेतला होता. यासाठी आपण प्रयत्न केले. आजही आपण सर्वपक्षीयसाठी आग्रही आहोत. पुढच्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वजण एकत्र येतील, असा विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - धक्कादायक... वारंगणांच्या वस्तीत सापडले दोन गुप्त भुयार, अल्पवयीन मुलींना लपवण्यासाठी व्हायचा उपयोग