जळगाव - मराठी अस्मितेसंदर्भात कर्नाटक सरकारची नेहमीच दुटप्पी भूमिका राहिली आहे. कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा रातोरात हटवून कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा आपली पातळी सिद्ध केली आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू शकतात, पण शिवरायांना मनातून कसे काढणार, अशा शब्दांत शिवसेनेचे उपनेते तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी कर्नाटक सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले आहे.
जळगावात रविवारी दुपारी कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गुलाबराव पाटील यांनी कर्नाटक सरकारचा समाचार घेतला. कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. पण तेथील काही स्थानिक लोकांनी आणि तथाकथित प्रादेशिक अस्मिता मिरवणाऱ्या संघटनांनी या प्रतिष्ठापणेला विरोध केला होता. कर्नाटक प्रशासनानेसुद्धा त्यांचीच बाजू घेत रातोरात हा अश्वारूढ पुतळा हटवला. मणगुत्ती ग्रामपंचायतीच्या ठरावाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा अश्वारुढ पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हा पुतळा हटवल्याने या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध ठिकाणी या संदर्भात आंदोलने करण्यात येत आहेत.
या विषयावर गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले, की या जगात जोपर्यंत सूर्य, चंद्र, तारे आहेत; तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे पुतळा हटवला म्हणजे, फार मोठे काम केले असे नाही. शिवरायांचा पुतळा हटवून कर्नाटक सरकारने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीत जाऊन समोरच्यांना नतमस्तक व्हायला लावले तर कर्नाटक काय आहे? अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.