जळगाव - कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उदघाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. दरम्यान, या प्रकल्पामुळे जिल्हा रुग्णालयात दिवसाला १.८७ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होणार असून, ऑक्सिजनच्या उपलब्धतेत रुग्णालय स्वयंपूर्ण होणार आहे.
देशभरात ३६ प्रकल्पांचे उद्घाटन-
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऋषिकेश येथे देशात उभारण्यात आलेल्या ३६ पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी देशभरातील पीएसए प्लांट बसविल्या गेलेल्या रुग्णालयांना ऑनलाईन संबोधित केले. जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उदघाटन श्रीफळ वाढवून व ऑक्सिजन मशीनची कळ दाबून करण्यात आले. यावेळी आ.सुरेश भोळे, आ.संजय सावकारे यांच्यासह प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, प्र. प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊराव नाखले उपस्थित होते.
नव्या प्लांटचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण होणार- पालकमंत्रीयावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ऑक्सिजन जनरेशन प्लांट हा साथरोग काळात तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प रुग्णांच्या उपचारासाठी व त्यांना बरे करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत. जिल्ह्यात अधिकाधिक ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारून जिल्हा ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ऑक्सिजन प्रकल्पाची वैशिष्ट्ये-साथरोग तसेच कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनची जागेवरच निर्मिती व्हावी, यासाठी पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांट ही संकल्पना निर्माण झाली. या प्लांटद्वारे हवेतूनच ऑक्सिजनची जागेवर निर्मिती केली जाते. त्यामुळे लिक्विड ऑक्सिजनवर अवलंबून रहावे लागत नाही. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्लांट हा एक हजार लीटर प्रतिमिनिट एवढा ऑक्सिजन निर्माण करू शकतो. याठिकाणी दिवसाला साधारण १.८७ मेट्रिक टन एवढा ऑक्सिजन निर्माण होईल. जो रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वाचा ठरेल. हा प्लांट पीएम केअर अंतर्गत डीआरडीओ व राज्य शासनाच्या मदतीने उभारण्यात आला असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
नव्या प्लांटचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन हेही वाचा - कोल्हापुरातील अजित पवारांच्या बहिणीच्या घरासह कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे छापे
हेही वाचा- राज्यातील प्रत्येक घरांत नळाद्वारे पोहचणार पाणी, २०२४ पर्यंत हे उद्दिष्ट गाठण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणांना सुचना