जळगाव- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे सुवर्णबाजारातील व्यवहार ठप्प आहेत. मात्र, मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज सुरूच असल्याने सोने-चांदीत गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही सोने-चांदीचे दर वाढत आहेत. मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजमध्ये सोने-चांदीच्या दराने उच्चांक गाठला आहे. सोन्याने ४५ हजार १०० रुपये प्रतितोळा तर चांदीने ४६ हजार रुपये प्रतिकिलोचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे, आठवडाभरात सोन्याच्या भावात ५ हजार ६०० रुपये प्रतितोळ्याने वाढ झाली आहे.
हेही वाचा- बारामतीतील 'त्या' कोरोनाबाधित व्यक्तीच्या दोन्ही नाती कोरोनाग्रस्त; शहरात एकूण संख्या 6वर
सोने-चांदीच्या दरावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा परिणाम होत असतो. त्यात चीनमधून जगभरात पोहचलेल्या कोरोना विषाणूच्या प्रसाराचाही परिणाम त्यावर गेल्या महिनाभरापासूनच होतच आहे. या कोरोनामुळे गेल्या महिन्यात सुवर्णबाजार अस्थिर होऊन दर कमी-जास्त होत आहेत. त्यानंतर लॉकडाऊनमुळे सुवर्णपेढ्या बंद आहेत. असे असले तरी मल्टी कमॉडिटी एक्सचेंज सुरुच आहे. कोरोनामुळे सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेत अनिश्चितता निर्माण झाल्याने सोन्यामध्ये गुंतवणूक वाढत आहे. यात सराफ बाजारातील अर्थकारण बंद असले तरी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सौदे सुरू आहेत.
सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक...
कोरोना विषाणू पसरण्यापूर्वी सुवर्ण व्यावसायिकांनी जे सौदे करुन ठेवले आहेत. त्यांची मुदत संपत आली की ते खरेदी अथवा विक्री करावे लागतात. त्यामुळे हे सौदे मुदत संपत आल्याने सुरू आहेत. याचा मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये मोठा फायदा घेतला जात आहे. सर्व उद्योग, व्यवसाय बंद असल्याने याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आतादेखील सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक केली जात आहे. परिणामी आंतराष्ट्रीय पातळीवर दलालांकडून सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढविले जात आहे.
सोन्याच्या दरात थेट ५६०० रुपयांची वाढ...
मागणी वाढत असल्याने गेल्या आठवड्यात मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये ३९ हजार रुपये प्रती तोळ्यावर असलेले सोन्याचे दर गुरुवारी ४५ हजार १०० रुपये प्रती तोळ्यावर पोहचले आहेत. अशाच प्रकारे चांदीचेही दर ४० हजारांवरुन ४६ हजार रुपये प्रती किलोवर पोहचले आहेत. कमॉडिटी एक्सचेंजमध्ये एवढे दर असतील तर ज्यावेळी सुवर्णबाजार सुरू होईल. त्यावेळी हे दर अधिकच राहणार असल्याची चिन्ह आहेत.
डॉलर ७६.२५ रुपयांवर...
सध्या कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठप्प झाल्याचे चित्र आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंची आयात सुरू आहे. लॉकडाऊनमुळे देशात व्यवहारच ठप्प झाल्याने देशातील निर्यात एकप्रकारे बंदच झाली आहे. त्यामुळे विदेशी चलन मिळणे एक तर बंद झाले व जीवनावश्यक वस्तूंची आयात करावी लागत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्वरुपात किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे अमेरिकन डॉलरचे दर वाढत आहेत. सद्यस्थितीत डॉलरचे दर ७६.२५ रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळेही सोने-चांदीचे दर वाढण्यास मदत होत असल्याचे सांगितले जात आहे.
अमेरिकी डॉलरचे दर वधारल्याने सोने-चांदीचे दर वाढत आहेत...
सध्या लॉकडाऊनमुळे सुवर्णपेढ्या बंद असल्या तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीचे व्यवहार सुरू असून मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सौदे केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीत गुंतवणूक केली जात आहे. त्यामुळे मागणी वाढली असून अमेरिकी डॉलरचे दर वधारल्याने सोने-चांदीचे दर वाढतच आहे, अशी माहिती जळगाव सराफ बाजार असोसिएशनचे अध्यक्ष अजय ललवाणी यांनी सांगितले.