जळगाव - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोनसाखळी चोरट्यांची टोळी गजाआड केली आहे. या टोळीत तिघांचा समावेश असून, त्यांच्याकडून सोनसाखळी चोरीचे 18 गुन्हे उघडकीस आले आहेत. आकाश ज्ञानेश्वर सूर्यवंशी (रा. प्रजापत नगर, जळगाव), अमोल उर्फ रामेश्वर राजेंद्र अहिरे (रा. विठ्ठलपेठ, गोपालपुरा, जळगाव) आणि सागर राजेंद्र चौधरी (रा. जुने जळगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांकडून 11 गुन्ह्यांमधील 6 लाख 25 हजार रुपये किंमतीचे 139 ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. या गुन्ह्यात चोरीचे सोने घेणारा सराफ व्यावसायिक दीपक शिवराम भडांगे (रा. ज्ञानदेव नगर, जळगाव) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
डॉ. प्रवीण मुंडे, पोलीस अधीक्षक आरोपी असे आले पोलिसांच्या नजरेत-गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये जळगाव शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी सोनसाखळी चोरीच्या सुमारे 30 घटना घडल्या होत्या. यासंदर्भात त्या त्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पोलीस सोनसाखळी चोरणाऱ्यांचा शोध घेत होते. याच दरम्यान, पोलिसांना तिन्ही आरोपींबाबत माहिती मिळाली होती. आरोपी हे काहीएक कामधंदा करत नसताना तसेच त्यांची घरची परिस्थिती बेताची असताना दारू पिणे, महागड्या दुचाकी व कपडे वापरणे, मौजमजा करणे असे प्रकार ते करत होते. हीच बाब पोलिसांनी हेरली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी ठिकठिकाणी सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
आरोपींमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरचा समावेश-
आरोपींमध्ये सागर चौधरी हा मेकॅनिकल इंजिनिअर आहे. तो 140 प्रतितास वेगाने दुचाकी चालवण्यात तरबेज आहे. तिन्ही आरोपी एकमेकांचे जिवलग मित्र आहेत. एके दिवशी शहरात एकत्र फिरत असताना त्यांच्यासमोर एक सोनसाखळी चोरीचा गुन्हा घडला. आपणही अशाप्रकारे चोरी करून पैसे मिळवू शकतो. असा विचार त्यांच्या मनात आला. त्यानुसार त्यांनी सोनसाखळी चोरीचा गुन्हा केला. त्यात यशस्वी झाल्याने त्यांनी नंतर जळगाव शहरासह जिल्ह्यातील भुसावळ, रावेर, अमळनेर, चोपडा, मुक्ताईनगर आदी ठिकाणी गुन्हे केले. यासोबतच धुळे, पुणे, हडपसर, खामगाव, कल्याण, कराड अशा ठिकाणी सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले.
तीन दुचाकीही हस्तगत-
पोलिसांनी या तिन्ही आरोपींकडून तीन दुचाकी देखील हस्तगत केल्या आहेत. दरम्यान, पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. त्यांच्याकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सात गुन्ह्यांमध्ये चोरलेला मुद्देमाल देखील पोलीस हस्तगत करणार आहेत.
हेही वाचा-शरजील उस्मानीला पुणे पोलिसांसमोर हजर राहावे लागणार!