जळगाव - सोने व चांदीच्या खरेदीत गुंतवणूक करण्यास उत्सुक असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड उलथापालथ झाल्याने सोने व चांदी या दोन्ही धातूंचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहरातील सुवर्ण बाजारात गेल्या 2 दिवसात चांदीचे दर तब्बल 4 हजार रुपयांनी तर सोन्याचे दर 1 हजार 300 रुपयांनी खाली आले आहेत.
अशी नोंदवली गेली घसरण
जळगावच्या सुवर्ण बाजारात सोमवारी (दि. 9 ऑगस्ट) 2 हजार 500 रुपयांची घसरण झालेल्या चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (10 ऑगस्ट) पुन्हा 1 हजार 500 रुपयांची घसरण होऊन ती 65 हजार रुपये प्रतिकिलोवर आली. सोने मात्र 47 हजार 400 रुपये प्रति तोळ्यावर स्थिर आहे. सोन्याचे दर सोमवारी 1 हजार 300 रुपयांनी कमी झाले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर औद्योगिक मागणीदेखील कमी झाल्याने हा परिणाम होत असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.
सोने 58 हजार तर चांदी होती 80 हजारांच्या उंबरठ्यावर
साधारणपणे वर्षभरापूर्वी कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारावर विपरित परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले होते. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा मल्टी कमोडिटी एक्सचेंजकडे वळवला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आर्थिक व्यवहार ठप्प असताना सोने व चांदीचे दर वाढले होते. सोने 58 हजार रुपये प्रति तोळा तर चांदीचे दर प्रति किलोला 80 हजार रुपयांच्या घरात गेले होते. मात्र, आता परिस्थिती बदलली असून, सोने 47 हजार रुपये प्रति तोळा तर चांदी 65 हजार रुपये प्रति किलोच्या घरात आली आहे.
सराफ व्यावसायिक काय म्हणतात..?
सोने व चांदीच्या दरात झालेल्या घसरणीबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनचे सचिव स्वरूपकुमार लुंकड यांनी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर सोने-चांदीत गुंतवणूक वाढली. त्यामुळे या दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव वाढत राहिले. मात्र, अलीकडच्या काळात विविध देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर होत आहे. आपल्या भारत देशातही सुवर्ण बाजारावर असाच परिणाम होत आहे. या परिणामामुळेच या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सुवर्ण बाजार उघडताच सोने-चांदीत मोठी घसरण झाली होती. सोन्याचे दर अजून 1 हजार रुपयांनी घसरू शकतात. चांदीच्या बाबतीत देखील हीच स्थिती आहे. त्यामुळे सोने व चांदीत गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्यांनी आता 30 टक्के इतकी खरेदी करायला हरकत नाही, असा सल्लाही स्वरूपकुमार लुंकड यांनी दिला.
हेही वाचा - बीएचआर गैरव्यवहारातील मुख्य संशयित सुनील झंवरला अखेर अटक