जळगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले लॉकडाऊन हळूहळू शिथिल होत असताना सर्वच व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. त्यातच सणासुदीच्या काळात मागणी वाढत असल्याने सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ सुरू झाली आहे. शुक्रवारी (दि. ६) जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या भावात एकाच दिवसात एक हजार रुपयांनी तर चार दिवसात तब्बल तीन हजार रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे चांदीचे भाव पुन्हा ६५ हजार ५०० रुपयांवर पोहचले आहेत. अशाच प्रकारे सोन्याच्या भावातही गेल्या चार दिवसात ९५० रुपयांनी वाढ नोंदवण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले लॉकडाऊन अनलॉक होत असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील आयात-निर्यात पूर्वपदावर येत आहे. यामध्ये सर्वच देशांकडून सोने-चांदीला मागणी वाढत असल्याने व त्यात सोने खरेदीत मोठा हिस्सा असलेल्या भारतातही सणासुदीच्या काळात या धातूंना मागणी वाढत आहे. नवरात्रोत्सव व दसऱ्यानंतर मागणी कमी झाल्याने सोने-चांदीचे भाव काहीसे कमी झाले होते. मात्र, आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा बाजारपेठेत लगबग वाढल्याने सोने-चांदीचे भाव वाढू लागले आहे.
चांदीच्या दरात आठवडाभरात साडेचार हजार रुपयांनी वाढ -
गेल्या आठवड्यात २९ ऑक्टोबरला ६१ हजार रुपये असलेल्या चांदीच्या भावात वाढ होऊन ती २ नोव्हेंबर रोजी ६२ हजार ५०० रुपयांवर पोहचली होती. त्यानंतर ५ नोव्हेंबरला ६४ हजार ५०० व आता ६ नोव्हेंबर रोजी ६५ हजार ५०० रुपयांवर पोहचली आहे. त्यामुळे आठवडाभराचे भाव पाहिले तर चांदीत साडेचार हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
हेही वाचा - लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
सोनेही चकाकले -
एकीकडे चांदीची चमक वाढत असताना दुसरीकडे, सोनेही चकाकले आहे. गेल्या आठवडाभरात सोन्याच्या भावात एक हजार ३५० रुपयांनी वाढ झाली. २९ ऑक्टोबरला ५१ हजार रुपयांवर असलेले सोने २ नोव्हेंबरला ५१ हजार ४०० रुपयांवर पोहचले. त्यानंतर ५ नोव्हेंबरला ते ५२ हजार २०० रुपये व शुक्रवारी 6 नोव्हेंबरला ५२ हजार ३५० रुपयांवर पोहचले.