जळगाव - जिल्ह्यातील पारोळा येथे घडलेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून दोषी आरोपींना कठोर शासन करावे, या मागण्यांसाठी आज (बुधवारी) दुपारी सर्वपक्षीय नेते, विविध सामाजिक संघटना तसेच पीडितेच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन निवेदन दिले. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, पीडितेवर अत्याचार करणाऱ्या तिघांसह त्यांना मदत करणाऱ्या महिलेला फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
काय आहे प्रकरण?
जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील टोळी येथील एका २० वर्षीय तरुणीचे अपहरण करत तीन नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. त्यानंतर बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत अत्यवस्थ झालेल्या पीडित तरुणीचा धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र संतप्त पडसाद उमटत आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी पीडितेचे कुटुंबीय जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला आलेले होते. यावेळी सर्वपक्षीय नेते, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या प्रकरणाचा तपास पोलीस योग्यरीतीने करत आहेत. तीन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना दिले.
हेही वाचा - जळगाव : दिवाळीसाठी मामाकडे आलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; विष पाजल्याने पीडितेचा मृत्यू
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने -
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यापूर्वी विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी या सामूहिक अत्याचार प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने केली. हे प्रकरण अतिशय गंभीर असून, राज्य सरकारने त्याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. राज्यात महिला तसेच दलितांवर अन्यायाच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पोलीस प्रशासनाने पीडितेच्या मामाने केलेल्या तक्रारीची योग्य वेळी दखल घेतली असती तर, ही घटना टळू शकली असती. मात्र, पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोपही करण्यात आला.
कुटुंबीयांची संरक्षणाची मागणी -
यावेळी पीडितेची आई तसेच बहिणीने आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी माध्यमांशी बोलताना केली. या घटनेनंतर आम्ही भीतीच्या वातावरणात आहोत. गावात आमच्या कुटुंबाला धोका आहे, असे पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले. आज आमच्यावर बेतलेला प्रसंग खूप वाईट आहे. असा प्रसंग कुणाच्याही वाटेला येऊ नये म्हणून पोलिसांनी तत्काळ कार्यवाही केली पाहिजे, असेही ते म्हणाले.