जळगाव - शहरातील पिंप्राळा उपनगरात आषाढी एकादशीनिमित्त सालाबादाप्रमाणे रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रथाच्या महापूजेनंतर महाजन माध्यमांशी बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. हा निर्णय समाधानकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकार 15 दिवसात आपली बाजू मांडणार आहे, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.
दरम्यान 'आमच्या सरकारला विठ्ठल प्रसन्न आहे, त्यामुळेच सर्व प्रश्न सुटत आहेत. थोडा उशीर जरूर होतोय, पण सरकारला, मुख्यमंत्र्यांना विठ्ठल प्रसन्न असल्याने प्रत्येक प्रश्न परिपूर्णतेने सोडवले जात आहेत', अशी प्रतिक्रिया महाजनांनी यावेळी दिली. 'गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवल्याशिवाय मी पंढरपूरला येणार नाही असे सांगितले होते, आता मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला आहे. त्यानंतरच मुख्यमंत्री पंढरपूरला गेले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. आमच्याकडे निष्णात वकिलांची टीम तयार आहे त्यामुळे आरक्षणाच्या मार्गात कायद्याची बाधा येणारच नाही, असा विश्वास त्यांनी वर्तवला.
आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आलेल्या रथोत्सवप्रसंगी गिरीश महाजन यांच्या सोबत शिवसेनेचे नेते तसेच राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे देखील उपस्थीत होते. यावेळी राज्याचा भावी मुख्यमंत्री कोण यावर उत्तर देताना पाटील यांनी, 'मुख्यमंत्री युतीचाच होईल' असे सांगितले. एकेकाळी आदित्य ठाकरे हेच आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील असे ठाणकावून सांगणाऱ्या शिवसेनेने सध्या एक पाऊल मागे घेतल्याचे दिसत आहे. 'मुख्यमंत्री हा युतीचाच होईल, मात्र तो कोणत्या पक्षाचा होईल हे नंतर ठरेल.' अशी गुगली गुलाबराव पाटील यांनी टाकली. आपल्या या विधानाला पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्या विधानाची पुष्टी देखील जोडली.