जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या बाबतीत अजब दावा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. 'नाशिकला झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात आलेल्या साधूंकडून गिरीश महाजन यांनी वशीकरण मंत्र शिकून घेतला आहे. याच मंत्राद्वारे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वश केले आहे. त्यामुळे महाजन जे सांगतील, तेच मुख्यमंत्री ऐकतात. तसेच महाजन जो दावा करतात तो खरा ठरतो', असा अजब दावा सतीश पाटील यांनी केला आहे.
सध्या राज्यभर राष्ट्रवादी-काँग्रेसची पडझड सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत डॉ. सतीश पाटील यांनी गिरीश महाजन यांना लक्ष करताना हा दावा केला. बैठकीला विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, निरीक्षक करण खलाटे आदी उपस्थित होते.
डॉ. पाटील पुढे म्हणाले, "आज आपल्या पक्षातून अनेक नेते बाहेर पडत आहेत. मात्र, तरीही कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. भाजपकडून सुरू असलेल्या दबावतंत्राला घाबरून नेते तिकडे जात आहेत. गिरीश महाजन हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर दबाव आणतात. आपण काहीही चुकीचे केले नाही तर ईडीला घाबरण्याची गरज नाही." सर्व कार्यकर्त्यांनी समर्थपणे एकजुटीने लढा दिला तर गिरीश महाजन यांना त्यांच्याच मतदारसंघात पराभूत करता येईल, असा विश्वासही डॉ. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
भगवा झेंडा कुणाची मक्तेदारी नाही
यावेळी डॉ. सतीश पाटील यांनी शिवसेनेला देखील लक्ष केले. भगवा झेंडा कुणाची मक्तेदारी नाही. भगवा झेंडा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आहे. त्यामुळे आपल्याही वाहनांवर भगवा झेंडा लावा, असे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.