जळगाव : सर्वांसाठी आनंद आणि चैतन्याची पर्वणी घेऊन येणाऱ्या गणेशोत्सवाची सर्वत्र लगबग सुरू आहे. आज मोठ्या उत्साहात, जल्लोषात गणरायाचं आगमन होणार आहे. त्यामुळे गणेशमूर्तींची चर्चा ऐकायला मिळत आहे. आजवर आपण नारळ, वृत्तपत्र, सोने व चांदीपासून गणेशमूर्ती साकारल्याचे ऐकले असेल. पण कधी साबुदाण्यापासून गणेशमूर्ती बनवल्याचे ऐकले आहे का? नाही ना... हो, जळगावात एका बंगाली मूर्तिकाराने चक्क नायलॉन साबुदाण्यापासून 5 फुट आकर्षक गणेशमूर्ती साकारली आहे. सध्या ही मूर्ती चर्चेचा विषय ठरली आहे.
मूर्तीकाराचे नाव
रामकृष्ण साचूगोपाल पाल (वय 41) असे या मूर्तिकाराचे नाव आहे. रामकृष्ण पाल हे मूळचे पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथील रहिवासी आहेत. मूर्ती साकारण्याचा त्यांचा पिढीजात व्यवसाय आहे. ते गेल्या 15 वर्षांपासून जळगावात विविध मूर्ती साकारण्याचे काम करत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे इतर 10 ते 12 कारागिर देखील मूर्ती साकारण्याचे काम करतात.
अशी सूचली गणेशमूर्ती साकारण्याची कल्पना
रामकृष्ण पाल हे दरवर्षी गणेशोत्सवासाठी वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित गणेशमूर्ती साकारतात. हेच वेगळेपण त्यांनी जपले आहे. यापूर्वी त्यांनी चहापत्ती, शेंगदाणे, काजू-बदाम, बिस्कीट, नारळ तसेच विविध फळांपासून गणेशमूर्ती साकारल्या आहेत. गेल्या वर्षी मध्य प्रदेशातील खेतिया येथील एका गणेश मंडळाने त्यांच्याकडून नारळाची गणेशमूर्ती विकत घेतली होती. यावर्षी याच गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जरा हटके संकल्पनेवर गणेशमूर्ती साकारण्याची विनंती केली होती. त्यानुसार रामकृष्ण पाल यांनी नायलॉन साबुदाण्यापासून गणेशमूर्ती साकारली.
20 दिवसात मूर्ती पूर्ण
रामकृष्ण पाल यांना ही गणेशमूर्ती साकारण्यासाठी 20 दिवस लागले. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ला माहिती देताना त्यांनी सांगितले, की 'या मूर्तीसाठी खास पश्चिम बंगाल येथून माती व गवत आणले होते. मातीपासून मूर्ती घडवल्यानंतर त्यावर नायलॉन साबुदाणे चिकटवले. मूर्तीसाठी तब्बल 50 किलो साबुदाणा लागला. मूर्ती आकारास आल्यावर तिला भारतीय तिरंग्याचा आकर्षक रंग देण्यात आला. सजावटीसाठी निरनिराळ्या रंगांचे व आकाराचे मणी, अलंकार मूर्तीला घालण्यात आले. तेव्हा अतिशय देखणी व विलोभनीय मूर्ती तयार झाली'.
मूर्तीची उंची-वजन
पाल यांनी बनवलेल्या या मूर्तीची उंची 5 फूट आहे. तिचे वजन जवळपास 5 क्विंटल इतके आहे. ही मूर्ती खेतिया येथील गणेश मंडळाने 15 हजार रुपयात विकत घेतली आहे, असेही रामकृष्ण पाल यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
कोरोनाचा मूर्ती व्यवसायाला फटका
'कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून मूर्तिकारांच्या व्यवसायाला फटका बसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यावर्षी आम्ही केवळ 30 मूर्ती घडवल्या आहेत. त्यातील 15 मूर्ती बुकिंग झाल्या. उर्वरित मूर्ती अद्यापही पडून आहेत. एकीकडे कच्चा माल महागला आहे. परंतु, दुसरीकडे कोरोनामुळे साकारलेल्या मूर्तींना उठाव नाही. मूर्ती घडवण्यासाठी केलेला खर्चही निघणार नाही', अशी परिस्थिती असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - गणपती बाप्पा मोरया : आज लाडक्या बाप्पासाठी झटपट 'असे' बनवा 'ड्राय फ्रूट' मोदक