जळगाव - चौघे मित्र सोबत दारु प्यायल्यानंतर त्यांच्यात किरकोळ वाद झाले. यातच एकाने दुसऱ्याच्या कानशिलात मारली. याच रागात थेट चाकूने वार करुन त्याने मित्रालाच संपवले. रविवारी रात्री १२ वाजता शिवाजीनगर परिसरातील मुख्य रस्त्यावर हा थरार झाला. या गुन्ह्यात पोलिसांनी तिन्ही संशयितांना अटक केली आहे. भूषण भरत सोनवणे ऊर्फ अठ्ठा असे मृत तरुणाचे नाव आहे. अतुल ज्ञानेश्वर काटकर (वय २५, रा. शहुनगर), दुर्गेश आत्माराम सन्यास ऊर्फ पपई (वय २६, रा. गेंदालाल मिल) व प्रतीक निंबाळकर (वय २५, रा. शिवाजीनगर) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
भूषणस अतुल, दुर्गेश व प्रतीक हे चौघे एकमेकांचे पक्के मित्र आहेत. रविवारी रात्री चौघे सोबत दारु प्यायले. यांनतर किरकोळ वाद झाला व त्यातून भूषणने अतुलच्या कानशिलात लगावली. यामुळे अतुलचा राग अनावर झाला. त्याने कमरेत लपवलेला चाकू काढून थेट भूषणवर वार केले. प्रतीक व दुर्गेश यांनीही भूषणला मारहाण केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भूषणची आई तिरोना धावत आली असता तिला पाहून तिघांनी पळ काढला. यावेळी विवेक नंदलाल मुंदडा, प्रवीण देविदास पाटील व संगम देविदास भोई या तिघांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र ते सापडले नाहीत. शहर पोलिसांनी रात्री उशिरा प्रतीक व अतुल यांना याच परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली.
हेही वाचा - जळगावातील शिवाजी नगरात पुन्हा तरुणाचा खून; एक संशयित ताब्यात
तिघांना पाच दिवस पोलीस कोठडी -
यांनतर दुर्गेश हा बहिणाबाई उद्यानापासून शहराच्या बाहेर पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती तेजस मराठे व योगेश इंधाटे या पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी दोघांना तेथून ताब्यात घेतले. तर तिसरा दुर्गेश उर्फ पपई याला पहाटे चारच्या सुमारास शाहू नगरातून अटक केली. या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिघांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
चौघेही अट्टल गुन्हेगार -
हे चौघे तरुण गुन्हेगारी पार्श्वभुमीचे आहे. त्यांच्यावर प्राणघातक हल्ले, जबरी लुटीचे गुन्हे दाखल आहेत. दुर्गेश याने दहा दिवसांपूर्वीच गुजराल पेट्रोल पंपाजवळ ट्रक अडवून चालकाकडून पैसे लांबवले होते. या गुन्ह्यात अटक होऊन नुकताच तो जामीनावर बाहेर आला होता. तर इतर तिघांवरही गंभीर गुन्हे दाखल आहेत.