जळगाव - जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पहिली घटना ही जामनेर तालुक्यातील जांभूळ येथे, तर दुसरी घटना चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे घडली. जांभुळच्या घटनेत चुलत भाऊ-बहिणीचा तर वाघळीला घडलेल्या घटनेत सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. अनंत चतुर्दशीला घडलेल्या या दोन्ही दुर्दैवी घटनांमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पायल नितीन जोशी (9) व रुद्र गोरख जोशी (6) अशी जांभुळच्या घटनेत मृत्यू झालेल्या चुलत भाऊ-बहिणीची नावे असून ते जामनेर तालुक्यातील गंगापुरी येथील रहिवासी होते. तर चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे राहणारे आयान शरीफ शहा (17) व साहिल शरीफ शहा (14) या दोन्ही भावंडांचा तितूर नदीपात्रात असलेल्या कमळेश्वर के. टी. वेअरजवळ पाण्यात बुडून मृत्यू झाला.
...अन इकडे घडली दुर्दैवी घटना! -
जामनेर तालुक्यातील गंगापुरी येथील रहिवासी असलेले नितीन एकनाथ जोशी व गोरख एकनाथ जोशी हे दोन्ही भाऊ भिक्षुकी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रविवारी ते वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी शेंगोळा येथे गेले होते. दुपारच्या सुमारास नितीन यांची मुलगी पायल व गोरख यांचा मुलगा रुद्र हे घराजवळ एकत्र खेळत होते. खेळता खेळता दोघे जण जांभूळ गावाजवळ असलेल्या केटीवेअर बंधाऱ्यापर्यंत गेले. त्याठिकाणी पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रुद्रचे मामा मुकुंदा जोशींना समजली. त्यांनी तत्काळ दोघांच्या आई-वडिलांना घटनेची कल्पना दिली. त्यानंतर जोशी कुटुंबीयांनी गावाकडे धाव घेतली. सायंकाळी उशिरा दोघांचे मृतदेह केटीवेअरच्या पाण्यात बाहेर काढण्यात आले. रात्री शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार झाले.
वाघळीत पोहायला गेलेले सख्खे भाऊ बुडाले -
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाघळी या गावी, पोहायला गेलेले दोन सख्खे भाऊ बुडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वाघळी गावालगत असलेल्या तितूर नदीपात्रातील कमळेश्वर केटी वेअरजवळ आयान व साहिल हे दोघे भाऊ पोहायला गेले होते. पोहत असताना त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. यामुळे ते पाण्यात बुडून गेले. या घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी नदीपात्राकडे धाव घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत दोघांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. रात्री आयानचा मृतदेह मिळून आला. पण साहिलचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत मिळून आला नव्हता. रात्री अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले. या घटनेमुळे वाघळी गावावर एकच शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - पोलिसांच्या विनंतीनंतर सोमैया कराडमध्येच उतरले; राष्ट्रवादी-भाजप संघर्ष टळला