जळगाव - शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी-स्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीत अवसायकाच्या काळात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून पतसंस्थेच्या चौकशीला सुरुवात केली आहे. चौकशी दरम्यान पोलिसांनी ठेवीदार संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे, सीए महावीर जैन, धरमकिशोर सांखला यांच्यासह पतसंस्थेचा कर्मचारी व अवसायक जितेंद्र कंडारे यांचा सहाय्यक सुजित बाविस्कर यांना अटक केली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या चारही संशयितांना आज (शनिवारी) पुणे येथे न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पतसंस्थेच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता कवडीमोल भावात खरेदी केलेल्या सर्व संशयितांच्या मालमत्तेचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. उद्योजक सुनील झंवर यांच्यासह इतर संशयितांनी स्वस्तात घेतलेल्या मालमत्तांची माहिती घेण्यात येत आहे. मालमत्तांचे व्यवहार संशयास्पद वाटल्यास त्या सील होण्याची शक्यता आहे. हा सर्व गैरव्यवहार १ हजार कोटी रुपयांपर्यंत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या पथकाकडून सुरू करण्यात आलेली तपासणी शनिवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होती. चौकशीत जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांसह व हार्ड डीस्कची तपासणी केली जात आहे.
ठेवी परत देताना टक्केवारीचा मलिदा?
ठेवीदारांनी केलेल्या आरोपानुसार अवसायक जितेंद्र कंडारे हे कर्जदारासोबत मिलीभगत करून ठेवीदारांना ठेवी परत करताना, ठेवीच्या मूळ रकमेच्या केवळ ३० टक्के परत देतात आणि ठेवीदारांकडून ठेवीची १०० टक्के रक्कम प्राप्त झाल्याचे लिहून घेतात. कर्ज नील झाल्याचे सर्टिफिकेट कर्जदाराला देखील दिले जात होते. तशी नोंद मात्र, त्याच्या खात्यात होत नव्हती. या व्यवहारात ठेवीदारांना ठेवीची दिलेली ३० टक्के रक्कम वगळून उरलेली ७० टक्के रकमेतील ३० ते ४० टक्के रक्कम जितेंद्र कंडारे यांना कमिशन म्हणून रोख स्वरुपात मिळत असल्याचा आरोप होत होता. ही रक्कम बेहिशेबी असल्याने तिची नोंद कागदोपत्री कुठेही आढळत नसल्याचाही ठेवीदारांना आरोप आहे. या दृष्टीने देखील चौकशी केली जात आहे.
पतसंस्थेच्या मालमत्तांची कवडीमोल दरात विक्री झाल्याचा संशय-
बीएचआर पतसंस्थेच्या राज्यभरात कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता आहेत. ठेवीदारांची देणी परत देण्यासाठी या मालमत्तांचा लिलाव अथवा विक्री करुन त्या पैशातून ठेवीदारांच्या रक्कमा परत करण्याचे आदेश प्रशासकांना देण्यात आले होते. त्यानुसार मालमत्तांची विक्री करुन देखील ठेवीदारांना पैसा का परत मिळत नाही? याची देखील चौकशी करण्यात येत आहे. या मालमत्तांची खरेदी करणारे अनेक जण मातब्बर आहेत. त्यांनी या मालमत्ता कवडीमोल दरात विकत घेतल्याच्या तक्रारी देखील गृहमंत्री यांच्याकडे गेल्या होत्या. या मालमत्ता सुनील झंवर यांनी खरेदी केली असल्याच्या संशयावरुन त्यांच्याकडे देखील तपासणी करण्यात आली आहे. त्यात सन २०१५ नंतर झंवर यांनी पाळधी, नाशिक, मुंबई, पुणेसह इतर राज्यात खरेदी केलेल्या मालमत्तांवर लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच यात अवसायक कंडारे आणि झंवर यांचे काही आर्थिक व्यवहार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या झाले आहेत का? याची देखील माहिती पोलीस घेत आहेत. या मालमत्तांचे व्यवहार संशयासपद वाटल्यास त्या मालमत्ता सील होण्याची शक्यता आहे.Conclusion:पतसंस्थेच्या देशातील ७ राज्यात २६३ शाखा-
जळगाव मुख्यालय असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी-स्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीच्या (बीएचआर) महाराष्ट्रासह ७ राज्यांमध्ये २६४ शाखा आहेत. एकट्या महाराष्ट्रात २५२ शाखा आहेत. यात २८ हजार ठेवीदारांच्या ११०० कोटींच्या ठेवी आहेत. इतर राज्यातील २०० कोटींच्या ठेवी आहेत. पतसंस्था अडचणीत आल्यानंतर २ फेब्रुवारी २०१५ रोजी संस्थापक प्रमोद रायसोनी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. बीएचआरच्या संचालकांवर ५३ पोलीस ठाण्यांमध्ये एमपीआयडी कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले आहेत. संस्थेचे संस्थापक प्रमोद रायसोनी यांच्यासह १४ संशयित सध्या कारागृहात आहेत.