जळगाव - ज्यांनी ज्यांनी वारंवार माझ्यावर आरोप केले, मला विधानसभेचे तिकीट मिळण्यात अडथळे निर्माण केले, माझ्या मुलीला तिकीट देऊन तिचा पराभव करण्यासाठी प्रयत्न केले, त्यांच्या विषयीचे सारे पुरावे मी पक्षाकडे दिलेले आहेत. मात्र, निवडणूक होऊन सहा महिने उलटले तरी त्यांच्यावर कारवाई का होत नाही? पुरावे नेमके कशाचे दिले आहेत, व्हिडिओ कोणाचे आहेत, रेकॉर्डिंग कशाची आहे, याबाबत पक्षाने निदान आम्हाला बोलावून तरी विचारले पाहिजे. माझे राजकीय जीवन उद्ध्वस्त करणाऱ्यांना जाब विचारण्याची हिंमत पक्षात आहे का? असा थेट सवाल आता माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाला विचारला आहे. खडसेंनी पुन्हा एकदा उघडपणे पक्षविरोधी भूमिका घेऊन बंडाचे संकेत दिले आहेत.
आपल्यावर पक्षाकडून अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत एकनाथ खडसे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. खडसे सातत्याने टीका-टिप्पणी करत माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आहेत. दोन दिवसांपूर्वी फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर खडसेंनी सोमवारी पुन्हा एकदा त्यांच्यासह भाजपाला लक्ष्य केले.
हेही वाचा - VIDEO : मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्यामुळेच माझ्याविरुद्ध षडयंत्र; खडसे म्हणाले...
खडसे पुढे म्हणाले की, मी आजच मागणी करत आहे असे नाही. तर वारंवार पक्षाकडे हीच मागणी करत आहे. ज्यांनी ज्यांनी हे कारनामे केले आहेत, त्यांच्याकडून पक्षाने उत्तरे घ्यावीत. मी संबंधित नेत्यांचे सारे पुरावे पक्षाकडे दिलेले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तेव्हा पुरावे पाहून मान्यही केले होते. कारवाईचे आश्वासनही दिले होते. मग कारवाई करायला विलंब का होत आहे. माझे राजकीय जीवन उद्ध्वस्त करणाऱ्यांना जाब विचारण्याची हिंमत पक्षात आहे का? पक्ष त्यांना जाब का विचारत नाही. एखाद्याचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, हे विचारायला पाहिजे ना. माझ्याविषयीचे आरोप खरे असतील तर कारवाई करा, गुन्हे दाखल करा. मात्र, काहीएक कारण नसताना अडकवून ठेवणे बरोबर नाही, अशी खंतही खडसेंनी यावेळी व्यक्त केली.
ड्रायक्लिनर फडणवीसांनी जो आला त्याला क्लीनचीट दिली मग मी काय केले होते?
देवेंद्र फडणवीस यांनी ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप होते, त्या सर्वांना क्लीनचीट दिली. जो आला त्याला क्लीनचीट दिली मग मी काय केले होते? आमच्या ड्रायक्लिनरकडे जो आला त्याला क्लीनचीट मिळायची. फक्त एकनाथ खडसे आले, त्यांना या ड्रायक्लिनरकडे क्लीनचीट मिळू शकली नाही. आमच्या ड्रायक्लिनरकडे अशी काय कला होती की तो खडसेंना क्लीन चीट देऊ शकला नाही. याचे कारण काय, हे विचारण्याचा मला अधिकार आहे, असा दावाही खडसेंनी केला आहे.