जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या जळगाव जिल्हा पक्ष कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी केक कापून, हवेत फुगे सोडून वाढदिवस साजरा करण्यात आला. शरद पवारांना उदंड आयुष्य लाभो म्हणत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सदिच्छा प्रदान केल्या.
तरुणांनाही लाजवणारा उत्साह
या कार्यक्रमाला माजीमंत्री गुलाबराव देवकर, एकनाथ खडसे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात आज वयाच्या 80व्या वर्षीदेखील शरद पवार हे आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. त्यांच्या कामाच्या शैली ही तरुणांनाही लाजवणारी आहे. शरद पवार हे सर्वांना प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व आहे, अशा भावना यावेळी नेतेमंडळीसह कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज (शनिवारी) वाढदिवस आहे. यानिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे तसेच समाजोपयोगी कार्यक्रम होत आहेत.
व्हर्च्युअल रॅली
शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईत मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून राज्यभर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होत आहे. जळगावात कांताई सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्यात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे शरद पवारांविषयी मनोगत मांडणार आहेत.