जळगाव - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. यापूर्वी इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा उघडल्या होत्या. त्यानंतर आजपासून (२७ जानेवारी) राज्यभरातील इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा गजबजणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील १९२६ शाळांची घंटा आज खणाणली. शाळा सुरू करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. त्यानुसार शाळांनी उपाययोजना केल्याचे पाहायला मिळाले.
राज्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा आजपासून (२७ जानेवारी) सुरू झाल्या. राज्यात कोरोनाचे संकट कमी होत असतानाच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या शैक्षणिक वर्षापासून शाळा बंद होत्या.
जळगाव जिल्ह्यातील १९२६ शाळांची खणाणली घंटा शाळांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश-जळगाव जिल्ह्यातील १९२६ शाळा आजपासून गजबजल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार शाळा उघडण्यापूर्वी शालेय परिसर तसेच वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करणे, विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या प्रवेशद्वारावरच हँड सॅनिटायझर, स्क्रिनिंगची व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी फिजिकल डिस्टन्सिंगमध्ये बैठक व्यवस्था अशा प्रकारच्या उपाययोजना आवश्यक आहेत. जिल्ह्यात इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या वर्गांमध्ये ३ लाख १० हजार २०१ विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र मागवण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील ७० टक्के शिक्षकांची कोरोना टेस्ट-इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यापूर्वी जिल्ह्यातील शिक्षकांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. त्यानुसार सुमारे ७० टक्के शिक्षकांची कोरोना चाचणी झाली आहे. त्यात काही शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना क्वारंटाईन राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात एकूण २० हजार ५५४ शिक्षक आहेत. त्यापैकी १३ हजार शिक्षकांची कोरोना चाचणी करण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन होते, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
२३ नोव्हेंबरपासून उघडल्या होत्या इयत्ता ९ ते १२ पर्यंतच्या शाळा-
दरम्यान, २३ नोव्हेंबर २०२० पासून इयत्ता ९ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यावेळी पालकांची परवानगी, शिक्षकांची कोरोना टेस्ट करणे, शाळांचे निर्जंतुकीकरण करणे आदी उपयायोजना करण्यात आल्या होत्या. आजपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. कोरोना संबंधित सगळ्या प्रकारची खबरदारी घेऊन शाळा उघडल्या गेल्या. पूर्वी केलेल्या उपाययोजना आताही करण्यात आल्या.