जळगाव - गेल्या वर्षी 2019 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा येथील एका शेतकरी कुटुंबातील तरुणाने जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर यश मिळवले आहे. कांतीलाल सुभाष पाटील असे युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तरुणाचे नाव आहे. कांतीलाल याने देशात 418 वी रँक मिळवली आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेऊन आयएएस अधिकारी होण्याच्या त्याच्या जिद्दीला दाद देत, अनेकांकडून त्याचे अभिनंदन होत आहे.
कांतीलाल पाटील याने तपत कठोरा गावातील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीपर्यंत प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर आठवी ते बारावीचे शिक्षण वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी नाशिक येथील के. के. वाघ इंजिनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर पुणे येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. काल (दि. 4) जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालात तो देशात 418 रँकने उत्तीर्ण झाला आहे.
वडील सुभाष पाटील तसेच आई कल्पना पाटील हे शेतकरी असतानाही कठीण परिस्थितीत कांतीलाल याने आपले शिक्षण पूर्ण केले असून लहानपणापासून आपण मोठा अधिकारी व्हायचे, अशी त्याची इच्छा होती. परंतु, गावात कसा अभ्यास करावा, हा प्रश्न त्याच्यासमोर होता. वडिलांजवळ त्याने आपली इच्छा बोलून दाखविली असता वडिलांनी त्यास संमती देत पाठबळ दिले. तुझ्यासाठी आम्ही राबायला तयार आहोत, तू फक्त प्रयत्न कर, असे सांगितल्यावर कांतीलालचा उत्साह वाढला. त्याने दररोज 8 ते 10 तास अभ्यास करून अखेर यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली.
पंचक्रोशीत पहिला आयएएस अधिकारी-तपत कठोरा या परिसरातील यूपीएससी उत्तीर्ण झालेला कांतीलाल हा पहिला युवक आहे. त्याच्या यशाबद्दल संपूर्ण गावामध्ये आनंद साजरा केला जात आहे. त्याचे ठिकठिकाणी सत्कार करण्याचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे. दरम्यान, लहानपणापासून पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात खरं झाले आहे. या यशामागे माझेच नाही तर माझ्या आई-वडिलांचे देखील परिश्रम आहेत. हे यश मी आई-वडिलांना समर्पित करतो. प्रशासकीय सेवेत जाऊन मला जनतेची सेवा करायची आहे, अशी भावना कांतीलाल पाटील याने व्यक्त केली.