जळगाव Cotton Ginning Industry Crisis : कापसाला भाव मिळत नसल्यानं राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. तोच हाल कापूस जिनिंग व्यावसायिकांचाही आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून पाहिजे तसा भाव मिळत नसल्यानं शेतकरी कापूस विक्री करत नाहीये. तर दुसरीकडे, सलग तीन वर्षांपासून कापसाची आवक कमी होत असल्यानं राज्यभरातील ९०० हून अधिक कापूस जिनिंग उद्योग संकटात सापडले आहेत.
शेतकऱ्यांची काय अपेक्षा : शेतकरी सततच्या अस्मानी संकटांमुळे हतबल झाला आहे. तो अनेकदा कर्ज काढून, चांगलं उत्पन्न मिळेल या आशेनं शेती करतो. मात्र कधी निसर्गाची अवकृपा तर कधी पिकाला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्याच्या पदरी निराशाच येते. यंदा तर कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. यावर्षी बळीराजानं नेहमीप्रमाणे कापूस पिकाची लागवड केली, मात्र पुरेसा पाऊस झाला नाही. तर दुसरीकडे हातात जे उत्पन्न आलं त्यालाही भाव मिळाला नाही. एकरामागे २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत लागवडीचा खर्च झाला, मात्र त्या तुलनेत उत्पन्न हातात आलं नाही. जे उत्पन्न आलं त्यालाही पाहिजे तसा भाव मिळत नसल्यानं शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. आता नफा नको, किमान लागवडीचा तरी खर्च निघावा आणि कापसाला किमान १० हजार रुपयापर्यंत तरी भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केलीये.
जिनिंगमध्ये कापसाची आवक शून्य : कापूस पिकावर शेतकऱ्याप्रमाणेच जिनिंग आणि सूतगिरणी उद्योगही अवलंबून असतो. मात्र कापसाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी ते जिनिंग व्यवसाय ही साखळी पूर्णपणे कोलमडली आहे. कापसाला पाहिजे तसा भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यानं कापूस घरात साठवून ठेवला. त्यामुळे जिनिंगमध्ये सध्या कापसाची आवक शून्य आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून जिनिंग उद्योगही तोट्यात सापडला आहे.
- महाराष्ट्रात ९०० हून अधिक कापूस जिनिंग फॅक्टरी आहेत. त्यापैकी खानदेशात १५० आहेत.
- या १५० पैकी १०० जिनिंग उद्योग बंद पडले आहेत.
- गेल्या तीन वर्षापासून लाखोंचा तोटा होत असल्यानं राज्यातील निम्म्याहून अधिक जिनिंग उद्योग बंद पडले.
- गेल्या ५० वर्षात पहिल्यांदाच जिनिंग उद्योग तोट्यात आहेत.
- यामुळे जिनिंग उद्योगावर अवलंबून असलेल्या हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ आलीये.
शेतकऱ्यांना किती भाव मिळण्याची अपेक्षा : गेल्या काही वर्षांत, अर्ध्याहून जास्त जिनिंग उद्योग बंद झाले असून, जे सुरु आहेत ते केवळ २५ ते ५० टक्के क्षमतेवर सुरु आहेत. शेतकऱ्यांना जिनिंग व्यावसयिकांकडून ८ हजार रुपये प्रति क्विंटल एवढ्या भावाची अपेक्षा आहे. मात्र जिनिंग व्यावसायिक शेतकऱ्यांना एवढा भाव देवू शकत नाहीत. आंतराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव, सुताचे भाव आणि निर्यात या सर्व परिस्थितीवर कापसाचे दर अवलंबून असतात.
..तर जिनिंग उद्योग कायमचे ठप्प होतील : ५० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कापूस जिनिंग उद्योग ठप्प झालेत. शेतकऱ्यांची चांगल्या भावाची अपेक्षा पूर्ण झाली, तरच जिनिंग उद्योगाचं भविष्य चांगलं आहे. मात्र भाव मिळाला नाही, तर कापसाचा पेरा कमी होईल आणि जिनिंग उद्योग पूर्णपणे डबघाईला येतील. यावर्षी परिस्थिती सुधारली नाही तर राज्यभरातील सर्व जिनिंग उद्योग कायमचे ठप्प होतील, अशी भीती भिती कापूस जिनिंग व्यावसायिक आणि कॉटन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा :