जळगाव - भाजपचे माजी खासदार तथा विद्यमान जिल्हाध्यक्ष हरिभाऊ माधव जावळे यांचे आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मुंबईत निधन झाले. मृत्यूसमयी ते 67 वर्षांचे होते. प्रकृती खालावल्याने त्यांना ५ जूनला मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ हलविण्यात आले होते. त्यादरम्यान आज (मंगळवारी) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, कल्पना, मुलगा अमोल, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
हरिभाऊ जावळे यांचा जन्म यावल तालुक्यातील भालोद येथे ३ ऑक्टोबर १९५३ रोजी झाला होता. ते विज्ञान पदवीधर होते. ते पूर्वी जनसंघात सक्रिय होते. सन १९९९ ते २००४ मध्ये यावल विधानसभा मतदारसंघाचे एक वेळा त्यांनी प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर २००७ मध्ये झालेल्या तत्कालीन जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत तसेच २००९ मध्ये १५ व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून गेले होते. या काळात सलग दोन वेळा त्यांनी लोकसभेचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर पुन्हा त्यांनी २०१४ मध्ये यावल-रावेर मतदारसंघातून विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांचे नाव जाहीर केले होते. पण ऐनवेळी त्यांच्याऐवजी भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसेंना संधी देण्यात आली होती. लोकसभेचे तिकीट नाकारल्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने त्यांना आमदारकीची संधी दिली होती. तेव्हा त्यांनी काँग्रेसचे शिरीष चौधरी यांचा १० हजार मतांनी पराभव केला होता. दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र, याच शिरीष चौधरी यांनी हरिभाऊ जावळे यांचा पराभव केला होता. त्यानंतर सध्या त्यांच्यावर पक्षाने जळगाव जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली होती.
सहकार क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य-
दोन वेळा खासदार आणि दोन वेळा आमदार राहिलेल्या हरिभाऊ जावळे यांचे सहकार क्षेत्रात भरीव कार्य असून, मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची धुराही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. केळी उत्पादकांसाठी त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना राज्यातील कृषी विभागातील राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेली जबाबदारीही त्यांना सोपविण्यात आली होती. केळी प्रक्रियाउद्योग, सूक्ष्मसिंचन तसेच पूर कालवे योजना मतदारसंघात राबविण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. एक मनमिळाऊ माणूस, शांत आणि संयमी नेतृत्त्व म्हणून त्यांची जिल्ह्याच्या राजकारणात ओळख होती. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.
हरिभाऊंच्या जाण्याने भाजपची मोठी हानी- चंद्रकांत पाटील
हरिभाऊ जावळे भाजपचे निष्ठावान नेते होते. त्यांच्या जाण्याने भाजपची अपरिमित हानी झाली आहे. हरिभाऊ आज आपल्यात नाहीत, यावर विश्वासच बसत नाही. मी एक जवळचा सहकारी गमावला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. हरिभाऊंच्या निधनाबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले असून, जावळे परिवाराच्या दुःखात आपण सहभागी आहोत, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम, शहरातील रुग्णसंख्या ३२२ तर जिल्ह्यात १८०४ एकूण बाधित