जळगाव - शहरात कचऱ्याची समस्या बिकट झाली आहे. कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या खासगी कंपनीच्या ठेकेदाराकडून चालढकल सुरू आहे. मात्र, महापालिका प्रशासन ठेकेदारावर मेहरबान आहे. यासंदर्भात 'ई टीव्ही भारत'ने वृत्त दिल्यानंतर महापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेली शिवसेना आक्रमक झाली आहे. पक्षातर्फे बुधवारी महापालिकेवर धडक मोर्चा काढत आयुक्तांना गाजर भेट देऊन कचऱ्याच्या समस्येकडे लक्ष वेधले.
शहरातील कचरा संकलनाचा पाच वर्षांचा सुमारे 75 कोटींचा ठेका नाशिकच्या वॉटर ग्रेस कंपनीला देण्यात आला आहे. दीड ते दोन महिन्यांपूर्वी ठेकेदाराने कामाला सुरुवात केली. मात्र, शहरात स्वच्छता होण्याऐवजी शहरातील अस्वच्छतेत अधिक भर पडली. दिवाळी सणाच्या काळात तर शहरवासियांना कचऱ्याच्या समस्येने अक्षरशः हैराण केले. शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. त्यामुळे शहरवासियांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरीही प्रशासनाकडून ठेकेदारावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
धक्कादायक बाब म्हणजे, ठेकेदारापुढे नमते घेत प्रशासनाने कचरा संकलनासाठी आपली सर्व यंत्रसामुग्री त्याच्या दिमतीला उपलब्ध करून दिली आहे. वास्तविक पाहता, करारानुसार संबंधित ठेकेदाराला कचरा संकलनासाठी सर्व तजवीज स्वतः करणे अपेक्षित आहे. ठेकेदाराच्या कामाविषयी सुरुवातीपासून तक्रारी असल्याने त्याचे चालू महिन्याचे बिल काढू नये, अशा सूचना सत्ताधारी भाजपचे उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी पत्राद्वारे आयुक्तांना केलेली आहे. तरीही प्रशासनाने ठेकेदाराचे चालू महिन्याचे 1 कोटी 46 लाख रुपयांचे बिल अदा केले आहे.
या प्रश्नी शिवसेनेने तक्रार केल्यानंतर महापालिकेचे राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. दरम्यान, या विषयासंदर्भात 'ई टीव्ही भारत'ने वृत्त दिल्यानंतर शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. बुधवारी शिवसेनेने थेट महापालिकेवर मोर्चा आणला.
आयुक्तांना दिले गाजर भेट-
कचऱ्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने मोर्चा काढत आयुक्तांना गाजर भेट दिले. कचऱ्याच्या ठेक्यात सत्ताधारी भाजपतील काही नगरसेवक, अधिकारी तसेच ठेकेदाराचे साटेलोटे असून सर्वांनी मिळून मलिदा लाटला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, शहरातील सर्व कचरा येत्या 7 दिवसात उचलावा, संबंधित ठेकेदाराला कामात सुधारणा करण्याच्या सूचना कराव्यात, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. शहरातील कचरा येत्या 7 दिवसात उचलला नाही तर शिवसेना तो कचरा उचलून महापालिकेच्या आवारात आणून टाकेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.