जळगाव - कोरोनामुळे राज्यभरात महामारीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे राज्य सरकारने ग्रामपंचायतींच्या येत्या निवडणुकांना पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली आहे. या अंतर्गत जुलै ते सप्टेंबर अखेर मुदत संपणाऱ्या जळगाव तालुक्यातील 43 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडणार आहेत. मुदतीनंतर या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त होणार आहेत.
जळगाव तालुक्यात 70 ग्रामपंचायती आहेत. यातील 43 ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते सप्टेंबर महिन्यात संपणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही निवडणुका घेण्यात येत नाहीत. अशा परिस्थितीत या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.
मार्च महिन्यात मुदत संपलेल्या काही निवडक ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. तेथे सध्या प्रशासक नेमले आहे. यासह दीड वर्षात झालेल्या 27 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 27 लोकनियुक्त सरपंच कार्यभार सांभाळत आहेत. कोरोना अजून काही दिवस कायम राहिल्यास साधारणपणे पुढील 6 महिन्यांसाठी प्रशासक ग्रामपंचायतीत अधिकार गाजवणार असल्याची स्थिती आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची ही पहिलीच वेळ आहे.
राज्य सरकारने निवडणूक आयोगास केली होती विनंती
निवडणुका घेण्याकरता प्रशिक्षण, मतदान यंत्राचा सामुदायिक वापरासह प्रचारासाठी होणारी गर्दी, सभा, पदयात्रांमुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे पुढील 6 महिने कोणत्याही निवडणुका होणार नसल्याच्या सूचना निर्गमित करण्यात याव्या, अशी विनंती राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे केली होती.