जळगाव - भडगाव येथील मतदान केंद्र क्रमांक १०७ वर प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी मॉकपोलची ५० मते डिलिट न केल्याने मतदानापेक्षा अतिरिक्त मते ईव्हीएममध्ये आढळली होती. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या मतदान केंद्रावर आता सोमवारी म्हणजेच २९ एप्रिलला फेरमतदान घेण्यात येणार आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघातील पाचोरा विधानसभा क्षेत्रातील भडगाव येथील मतदान केंद्र क्रमांक १०७ वर २३ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले होते. यावेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सुरुवातीला मॉकपोल (अभिरुप मतदान) घेण्यात आले. यात ५० मते देवून ती कोणाला जातात, याची खात्री करण्यात आली होती. त्यानंतर हे मॉकपोलचे मतदान डिलिट करुन नियमित मतदान प्रक्रिया घेणे आवश्यक होते. मात्र, हे मतदान डिलिट न करता नियमित मतदान घेण्यात आले. त्यामुळे या केंद्रावर झालेल्या एकूण मतदानापेक्षा ५० मते ईव्हीएममध्ये अधिक आढळून आली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी संबंधित केंद्राध्यक्ष उध्दव पाटील यांनी निलंबित केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाला याबाबतचा अहवाल पाठविण्यात आला होता. त्यावर आयोगाने या केंद्रावर चौथ्या टप्प्यात राज्यातील इतर ठिकाणी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी सोमवारी (दि.२९) फेरमतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत फेरमतदान घेतले जाणार आहे. याबाबतचे राज्य निवडणूक आयोगाचे पत्र जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्राप्त झाले आहे.