जळगाव - सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या या लोकनेत्याने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. मुंडे साहेबांशी माझे कौटुंबीक संबंध होते. त्यांनी केलेले मार्गदर्शन आणि मदत विसरता येणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. ते मुक्ताई निवासस्थानी बोलत होते.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज (शनिवारी) दुपारी एकनाथ खडसे यांच्या जळगावातील मुक्ताई निवासस्थानी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या विषयीच्या आठवणींना एकनाथ खडसे यांनी उजाळा दिला. यावेळी मुंडेंविषयीच्या आठवणींना उजाळा देताना ते भावूक झाले. खडसे म्हणाले, की गोपीनाथ मुंडे हे सर्वसामान्य जनतेचे नेते होते. उपेक्षित आणि वंचित लोकांसाठी ते आयुष्यभर काम करत राहिले.
मुंडेंच्या जाण्याने महाराष्ट्राची कधीही न भरून निघणारी हानी-
एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, मुंडे साहेबांच्या जाण्याने महाराष्ट्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. कार्यकर्त्यांवर ते खूप प्रेम करायचे. कार्यकर्ता जोडण्याला त्यांचे प्राधान्य असायचे. आयुष्यभर सर्वसामान्य लोकांसाठी ते काम करत राहिले. म्हणूनच त्यांच्याकडे गोरगरिबांचा नेता म्हणून पाहिले जाते. मुंडे हयात असेपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा होती. आज ते आपल्यात राहिले असते तर कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणाची स्थिती वेगळी राहिली असती. दुर्दैवाने मुंडे साहेब आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे विचार आपल्यासोबत आहेत. याच विचारांना सोबत घेऊन आपण काम करावे, असेही खडसे म्हणाले.
गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचे पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये घेतले दर्शन-
लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या कुटुंबीयांसह गोपीनाथ गडावर त्यांच्या समाधीचे बीड जिल्ह्यात दर्शन घेतले. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे सर्व मोठे कार्यक्रम रद्द करून केवळ रक्तदान शिबीर व गोपीनाथ गडावर भजन कार्यक्रम घेण्यात आला. गोपीनाथ गडावर आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी पंकजा मुंडे यांनी हातात टाळ घेऊन भजन कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला.