जळगाव - भाजपामधील ६० टक्के लोक हे बाहेरून आलेले आहेत. मग त्यांनाही चॉकलेट किंवा कॅडबरी देऊनच पक्षात आणले आहे का? अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. चॉकलेट आणि कॅडबरी हा चंद्रकांत पाटील यांचाच अनुभव आहे, असा चिमटा देखील खडसेंनी यावेळी काढला.
एकनाथ खडसे आज दुपारी मुक्ताईनगर येथून जळगावात त्यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. खडसेंनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय निवडल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका करताना 'राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांना चॉकलेट दिले की कॅडबरी?' असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा समाचार घेताना खडसे म्हणाले की, भाजपात ६० टक्के लोक बाहेरचे आहेत. मग त्यांनाही चॉकलेट देऊन आणले आहे का? चंद्रकांत पाटलांच्या म्हणण्यानुसार, काल दसऱ्याच्या निमित्ताने मला भेटण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला मी चॉकलेट आणि कॅडबरी दिली, अशा तिरकस शब्दात खडसेंनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
चार-पाच दिवस थांबा
यावेळी पत्रकारांनी खडसेंना राष्ट्रवादीतील त्यांच्या पुढील भूमिकेबाबत विचारणा केली असता, अजून चार-पाच दिवस थांबा, असे सांगत खडसेंनी लवकरच मोठे गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिले.
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्यासोबत झालेल्या बंदद्वार बैठकीबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यात दुसऱ्या पक्षातील अनेक नेतेमंडळी व कार्यकर्ते राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक आहेत. याबाबत आज आमची चर्चा झाली. राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असणाऱ्या लोकांची यादी तयार करावी. नंतर त्या ठिकाणी एक जाहीर मेळावा घेऊन सर्वांना प्रवेश द्यावा, असे बैठकीत ठरले. शिवाय काही नगरपालिका निवडणुकीबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे खडसेंनी सांगितले.
जिल्ह्याचा नेता कोण? खडसे म्हणाले...
आता राष्ट्रवादीत जळगाव जिल्ह्याचा नेता कोण? हा प्रश्न खडसे यांना विचारला असता ते म्हणाले, कोणत्याही पक्षाचा अध्यक्ष हा प्रथम नेता असतो. त्यानंतर स्थानिक पातळीवर ज्या वरिष्ठांनी पक्षासाठी योगदान दिलेले असते, त्यांना आपण नेता म्हणतो, असे सांगत खडसेंनी अधिक बोलणे टाळले. त्याचप्रमाणे, राष्ट्रवादीच्या स्वागत सोहोळ्यातील गटबाजीचेही त्यांनी खंडन केले. मी मुंबईहून परतल्यानंतर माझ्या स्वागताचा कार्यक्रम हा पूर्वनियोजित नव्हता. तो अचानक ठरलेला कार्यक्रम होता. त्यामुळे, आपण बाहेरूनच पाच ते दहा मिनिटात उपस्थित लोकांकडून सत्कार स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मनीष भंगाळेवर गुन्हा दाखल करावा
हॅकर मनीष भंगाळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही खडसेंनी केली. बँकिंग डेटा चोरून ऑनलाइन पद्धतीने कोट्यवधी रुपयांची रक्कम चोरण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी भंगाळे याच्या मदतीने काही संशयितांना पकडले आहे, असे पोलीस म्हणत आहेत. परंतु, भंगाळे याने ऑनलाइन हेराफिरी करून दाखवली आहे. त्यामुळे, त्याने असे कृत्य यापूर्वी केल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. पण, या प्रकरणात जळगाव पोलिसांची भूमिका दुटप्पीपणाची वाटते, असेही खडसे म्हणाले.
हेही वाचा- राष्ट्रवादी प्रवेशानंतर खडसे 'अॅक्शन मोड'मध्ये; खान्देशातील व्यूहरचनेची करताहेत आखणी