जळगाव - मुक्ताईनगर मतदारसंघातून रोहिणी खडसेंनी भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. एकनाथ खडसेंऐवजी त्यांची मुलगी रोहिणी यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. अर्ज दाखल केल्यानंतर एकनाथ खडसेंनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला. त्यांनी पक्षाच्या निर्णयाचे समर्थन केले असून 'महाराष्ट्रात माझे सरकार यावे हीच आपली भूमिका असेल', असे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - दिग्गजांच्या तिकिट कपातीने मुख्यमंत्र्यांचे आसन बळकट
'तरुण नेतृत्त्वाच्या बाजूने विचार करून पक्षश्रेष्ठींनी रोहिणी खडसेंना पसंती दिली आहे. सहकार क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्रात त्या गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. त्याचप्रमाणे मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या 40 वर्षांपासून मी जे काम करत आलो आहे त्यात त्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून वाटा उचलला आहे. तरुणवर्ग देखील त्यांच्यासोबत आहे. हाच विचार करून पक्षाने त्यांना संधी दिली आहे. गेल्या चार दिवसात जे घडलं त्या कार्यकर्त्यांच्या भावना होत्या. मात्र, पक्षाच्या निर्णयावर कार्यकर्ते समाधानी आहेत. यापुढे महाराष्ट्रात माझं सरकार यावं हीच माझी भूमिका असणार आहे' अशी प्रतिक्रिया भाजप नेते तथा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी दिली आहे.