जळगाव - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरू होत आहे. परीक्षा कालावधीत एखाद्या परीक्षा केंद्रावर 5 पेक्षा जास्त कॉपी केसेस आढळल्यास केंद्र संचालकासह पर्यवेक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार, असा इशारा शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागाचे सचिव नितीन उपासनी यांनी दिला आहे.
इयत्ता दहावीची परीक्षा निकोप आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी, या अनुषंगाने रविवारी दुपारी जळगावात केंद्र संचालक आणि पर्यवेक्षकांना आवश्यक त्या सूचना करण्यासाठी शिक्षण मंडळाच्या वतीने शहरातील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महाविद्यालयात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत नितीन उपासनी बोलत होते. या बैठकीला जिल्हाभरातील परीक्षा केंद्रांचे केंद्र संचालक तसेच पर्यवेक्षक उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यातील 64 हजार 70 विद्यार्थी या वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. जिल्ह्यातील 134 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यात 20 केंद्र उपद्रवी असून त्यांच्यावर शिक्षण मंडळाची विशेष नजर असणार आहे. दहावीची परीक्षा निकोप व कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून शिक्षण मंडळाच्या वतीने केंद्र संचालकांसह पर्यवेक्षकांना आवश्यक त्या सूचना करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिक्षण मंडळाचे सचिव नितीन उपासनी यांनी मार्गदर्शन केले.
परीक्षा काळात गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष नियोजन यावेळी करण्यात आले. प्रत्येक परीक्षा केंद्राबाहेर परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांची सक्तीने झडती घेणे, परीक्षा केंद्रांवर मोबाईल तसेच इलेक्ट्रॉनिक व तत्सम वस्तूंना बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचे लिखित साहित्य देखील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात आणता येणार नाही. या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र संचालक तसेच पर्यवेक्षकांवर असणार आहे.
एखाद्या परीक्षा केंद्रावर 5 पेक्षा जास्त कॉपी केसेस आढळल्यास महाराष्ट्र खासगी शाळा सेवा, शर्थी नियमावली 81 च्या अनुषंगाने केंद्र संचालकासह पर्यवेक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असेही उपासनी यांनी यावेळी स्पष्ट केले.