जळगाव - गेल्या दोन ते तीन दिवसंपासून विदर्भात मुसळधार पाऊस पडत असल्याने तापी व पूर्णा नद्यांच्या पाणीपातळी वाढ झाली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाचे १६ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. सद्यस्थितीत हतनूर धरणातून १ हजार ६४ क्युसेक म्हणजेच ३७ हजार ५७५ क्युसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. खबरदारी म्हणून तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यंदा तापीऐवजी पूर्णा नदीला आला पहिला पूर -
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पूर्णा नदीच्या खोऱ्यात गेल्या २४ तासात दमदार पाऊस झाला आहे. यामुळे पूर्णा नदीला पूर आला असून, हतनूर धरणात पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे धरणाचे १६ दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. एरवी तापी नदीला पूर आल्यानंतर हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातो. मात्र, यावर्षी तापीऐवजी पूर्णा नदीला पूर आला आहे. सोमवारी पहाटेपासून धरणात पाण्याची आवक सुरू आहे.
अशी आहे धरणाची सद्यस्थिती -
हतनूर धरणाच्या १६ दरवाजातून प्रती सेकंद १ हजार ६४ क्युमेक्स म्हणजेच, ३७ हजार ५७५ क्युसेक्स इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर उजव्या तट कालव्यातून ३०० क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे. धरणाची जल पातळी २०९.५५० मीटर, साठा १८१.०० दलघमी (४६.६४ टक्के) आहे. धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे तापी काठावरील गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता एन. पी. महाजन यांनी दिली.