जळगाव - जिल्ह्यातील सुमारे ४ हजार ९२४ हेक्टर क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. गेल्या महिनाभरात जळगाव जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६८ टक्के पाऊस झाला आहे. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती दूर झाली आहे. परंतु, काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. जिल्ह्यातील सुमारे ४ हजार ९२४ हेक्टर क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे उडीद, मूग, सोयाबीन यासारख्या कडधान्य पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
यावर्षी जळगाव जिल्ह्यात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दमदार पाऊस झाला. त्यानंतर जवळपास महिनाभर पावसाने जिल्ह्यात मुक्काम ठोकला. जिल्ह्यातील अमळनेर, जामनेर, यावल, रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ या तालुक्यांमध्ये तर अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये अजूनही कापूस, ज्वारी, बाजरी, उडीद, मूग यासारखी पिके अर्धा ते एक फुटापर्यंत पाण्यातच आहेत. शेतातून पाण्याचा निचरा होत नसल्याने पिके पिवळी पडत आहेत. काही ठिकाणी तर पिके अक्षरशः जळून गेली आहेत. जिल्ह्यात आता उन्हाचा चटका वाढू लागला असला तरी अधूनमधून मुसळधार श्रावणसरी बरसत आहेत. त्यामुळे शेतांमध्ये वाफसा होत नाही. उडीद, मूग, भुईमूग ही पिके आता फुलोऱ्यावर आली आहेत. परंतु, पाऊस थांबत नसल्याने ही पिके हातून जाण्याची भीती आहे. त्यामुळे शासनाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी होत आहे.
सलग महिनाभर दमदार पाऊस झाल्याने जळगाव जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी ७० टक्के झाली आहे. जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये एकूण ४८ टक्के जलसाठा झाला आहे. ही समाधानकारक बाब असली तरी अतिवृष्टी झालेल्या तालुक्यांमध्ये मात्र, पिके वाया जाण्याची भीती आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सुमारे ४ हजार ९२४ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. त्यात एकट्या अमळनेर तालुक्यातील ४ हजार २०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा समावेश आहे. कृषी विभागाने अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या भागांचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. ज्या भागातील शेतांमध्ये पाणी साचले आहे, तेथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करावी. त्यानंतर कृषी तज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात. असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जिल्ह्यातील काही तालुके वगळले तर इतर तालुक्यांमध्ये कापूस, ज्वारी, बाजरी, मका, उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन या पिकांची स्थिती चांगली आहे. मात्र, आता काही काळ पाऊस थांबणे आवश्यक आहे. तरच मशागतीची कामे होऊन खरिपाचे पीक हाती येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.