जळगाव - जगभरात केवळ भारत सर्वाधिक वैविध्यपूर्णतेने नटलेला देश आहे. विशेष म्हणजे मराठी ही सर्वात प्राचीन भाषा आहे. साहित्याचा विचार केल्यास केवळ मराठी साहित्य सर्वांना समजण्याजोगे आहे. त्यामुळे ते सर्वसमावेशक ठरत आहे, असे मत ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित एक दिवसीय पंधरावे राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन रविवारी पार पडले. यावेळी संमेलनाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. मोरे बोलत होते.
मराठी भाषा अभिजात आहे -
मराठी भाषा ही अभिजात आहेच. प्राचीन काळापासूनच मराठीतून उच्च दर्जाची साहित्य निर्मिती झाली आहे. इतकेच नव्हे तर संस्कृत साहित्यकांनीही याच भाषेतील साहित्याचा संस्कृतमध्ये अनुवाद केला. अनेक ठिकाणी मराठी साहित्याची उदाहरणे देखील दिली. एवढे दर्जेदार साहित्य मराठीतून तयार झालेले आहेत. सातवाहन राजांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला. राजेदेखील मराठीतून कविता करू लागले. त्यामुळे मराठी ही दरबाराची भाषा झाली. मात्र, त्यानंतर चालूक्य राजांनी महाराष्ट्रातील प्राकृत भाषा काढून घेतली आणि मराठी भाषेचा ऱ्हास झाला. चालूक्य राजांमुळे मराठीचा ऱ्हास झाल्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात या प्राकृत भाषेला जैन धर्मियांनी संजीवनी दिली. त्यानंतर ती संत ज्ञानेश्वरांपर्यंत टिकून राहिली. यादव राजांनी पुन्हा मराठीला राजाश्रय दिला असल्याचे डॉ. मोरे म्हणाले.
पूर्वी वेद हे केवळ साहित्यकांनाच समजत असत. त्यांच्या पत्नींनादेखील ते समजत नव्हते. इतरांची तर वेगळीच स्थिती असायची. त्यानंतर मात्र मराठीतील अनुवादीत साहित्य सर्वांना समजू लागले. पहिला धर्मग्रंथ असलेली भगवद्गीता संत ज्ञानेश्वरांनी सर्वात प्रथम मराठीत अनुवादीत झाली. त्यामुळे ती सर्वांची होऊ शकली. मराठीचा प्राचीन काळ पाहिला तर मराठी भाषा ही सर्वसमावेशक असल्याचे आढळून येते. त्यामुळे या साहित्य संमेलनाप्रमाणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही सर्वसमावेशक व्हावे, अशी अपेक्षा डॉ. मोरे यांनी व्यक्त केली. मराठी साहित्यात बहिणाबाई चौधरी यांची गाथा वाचल्याशिवाय संत तुकोबांची गाथा वाचणे पूर्ण होणार नाही, असेही डॉ. मोरे यांनी नमूद केले.
साहित्य लिहिताना इतिहासाचा आधार घेतल्यास योग्य सांगड घातली जाऊ शकते. आपले रंजक साहित्य मांडून खरा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले. राजा-महाराजांनी आपल्या दरबारात साहित्यिकांना स्थान दिल्याचे परदेशी म्हणाले. महाराष्ट्रातील साहित्याचा शोध महाराष्ट्रासोबतच इतरही ठिकाणी घेतल्यास साहित्य निर्मितीस मोठी मदत होऊ शकते, असा सल्ला डॉ. नरसिंह परदेशी यांनी दिला. मराठी साहित्याचा केवळ महाराष्ट्रातच शोध घेतला जातो. मात्र, मराठी साहित्य संपदा राजस्थानात बिकानेर येथेही आढळून येते, असे परदेशी यांनी सांगितले.
विविध पुरस्कार देऊन साहित्यिकांचा गौरव -
प्रा. डॉ. संजीव गिरासे यांच्या ‘पायखुटी’ या कादंबरीचे तसेच दीपक तांबोळी यांच्या ‘हा खेळ भावनांचा’ या कथासंग्रहाचे, तर दिनकर बागडे लिखित ‘कवीचंद भाट’ या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विविध पुरस्कार देऊन साहित्यकांचा गौरव करण्यात आला. यामध्ये अखिल भारतीय श्री दलुभाऊ जैन मराठी साहित्य भूषण पुरस्कार डॉ. सुधाकर गायधनी, अखिल भारतीय भवरलाल जैन सूर्योदय साहित्यरत्न पुरस्कार डॉ. सदानंद मोरे, सूर्योदय सेवा पुरस्कार भगवान भटकर, सूर्योदय साहित्य भूषण पुरस्कार अशोक नीलकंठ सोनवणे, सूर्योदय बाल साहित्य पुरस्कार किशोर पाठक, सूर्योदय सेवाव्रती पुरस्कार पांडुरंग सुतार, सूर्योदय काव्य पुरस्कार नामदेव कोळी, सूर्योदय शब्दरत्न पुरस्कार प्रा. रमेश लाहोटी, सूर्योदय सेवारत्न पुरस्कार सावळीराम तिदमे, सूर्योदय कलाश्री पुरस्कार राजू बाविस्कर यांना देण्यात आला. संमेलनाचे मावळते अध्यक्ष प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे हजर राहू न शकल्याने दलुभाऊ जैन यांच्या हस्ते प्रा. डॉ. सदानंद मोरे यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली. प्रास्ताविक मंडळाचे उपाध्यक्ष प्रवीण लोहार यांनी केले.