जळगाव- माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी पक्षांतर केल्यानंतर भाजपातील अंतर्गत फेरबदलांना गती आली आहे. तब्बल आठ महिने उशिराने व कार्यकाळ संपायला पाच महिने शिल्लक असताना महापालिकेचे उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी गुरुवारी सायंकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याबाबत माजीमंत्री गिरीश गिरीश महाजन यांनी बुधवारी डॉ. सोनवणे यांना उपमहापौर पदाचा राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, उपमहापौरांनी आपला राजीनामा महापौर भारती सोनवणे यांच्याकडे सोपवला आहे.
डॉ. अश्विन सोनवणे यांनी राजीनामा दिला तेव्हा भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, महिला बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, माजी स्थायी समिती सभापती अॅड. शुचिता हाडा, कैलास सोनवणे, धिरज सोनवणे, विशाल त्रिपाठी, किशोर चौधरी उपस्थित होते. महापालिकेत सत्तेत आल्यानंतर महापौर व उपमहापौरांना प्रत्येकी १० महिन्यांचा कार्यकाळ पक्षाने निश्चित करून दिला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे काही महिने मुदतवाढ दिली होती. विधानसभा निवडणूक संपल्यानंतर तत्कालीन महापौर सीमा भोळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जानेवारी महिन्यात दिला. तर उपमहापौरांचा राजीनामा पक्षाने घेतला नव्हता. त्यानंतर कोरोना व इतर बाबींमुळे उपमहापौरांना मुदतवाढ देण्यात आली होती.

स्वीकृत नगरसेवकांचाही घेतला जाणार राजीनामा?
उपमहापौरांचा राजीनामा घेतल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवकांचा देखील राजीनामा पक्षाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. स्वीकृत नगरसेवकांना पक्षाकडून १ वर्षाची मुदत देण्यात आली होती. मात्र, पक्षाने अद्याप राजीनामा घेतला नव्हता. याआधी पक्षाने राजीनामा देण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, कोरोनामुळे ही प्रक्रिया देखील थांबली होती. आता खडसे यांच्या पक्षांतरानंतर चित्र बदलले असून, स्वीकृत नगरसेवकांचेही राजीनामे पक्षाकडून घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.