जळगाव- जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दुधाच्या खरेदी दरात १ सप्टेंबरपासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हशीच्या दुधात ३ रुपयांनी, तर गाईच्या दूध खरेदीत १ रुपये २० पैशांनी वाढ केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग-धंदे संकटात आहेत. दूध संघही प्रभावित झाला असून दूध विक्रीत घट झाली आहे तर पावडर व बटरचे दरही अपेक्षेप्रमाणे नाही. तसेच, दूध संघाकडे अतिरिक्त दूध असूनही संघाने मासिक सभेत म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर ३ रुपये व गायीच्या दुधात १ रुपया २० पैसे अशी वाढ केली आहे. १ सप्टेंबरपासून ही वाढ लागू होणार असून, त्यामुळे दूध संघावर दरमहा १ कोटी २५ लाखांचा अधिक बोजा पडणार आहे.
दरम्यान, जिल्हा दूध संघाने घेतलेल्या निर्णयाबद्दल जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केल आहे. सध्या सण-उत्सवांचा काळ असल्याने दूध विक्री दरात संघाने कुठलीही वाढ केलेली नाही. दूध उत्पादक संस्थांनी जिल्हा दूध संघास जास्तीत जास्त दूध पुरवठा करावा, असे आवाहन चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी केले आहे.
हेही वाचा- मुसळधार पावसामुळे वाघूर नदीला पूर, धरणाचे दोन दरवाजे उघडले