जळगाव - जिल्ह्यातील भुसावळ शहरातील एमआयडीसीत असलेल्या डिस्को इंटरप्राईजेस या इलेक्ट्रिकल वस्तू निर्मितीच्या कंपनीला रविवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कंपनी तसेच 2 आयशर ट्रक जळून खाक झाल्या. या दुर्घटनेत सुमारे 1 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, ही आग कशामुळे लागली, याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
भुसावळ शहरातील किन्ही रस्त्यावर खडका शिवारात एमआयडीसी आहे. या एमआयडीसीत ए- 12 प्लॉटमध्ये डिस्को इंटरप्राईजेस नावाची टिव्ही, फायबर, कुलर आदी वस्तूंची निर्मिती करणारी इलेक्ट्रिकल कंपनी आहे. या कंपनीत सकाळी साडेअकराच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आगीचे कारण कळू शकले नाही. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने तसेच कंपनीच्या आजूबाजूला गवत असल्यामुळे आग अधिक भडकली. अवघ्या दीड तासात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. दरम्यान, या कंपनीच्या कंपाऊंडमध्ये 2 आयशर ट्रक पार्किंग केले होते, ते देखील आगीत भस्मसात झाले. या घटनेप्रकरणी पोलिसांत नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
तीन अग्निशमन बंबांनी आग आणली आटोक्यात -
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भुसावळ नगरपालिकेचे 2 व दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचा 1 अशा 3 अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले होते. तिन्ही बंबांनी तब्बल 10 ते 12 फेऱ्या करूनही आगीवर नियंत्रण आले नव्हते. दरम्यान, आगीची माहिती मिळताच बाजारपेठ व तालुका पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य केले. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळाले. परंतु, तोपर्यंत कंपनी आगीत जळून खाक झाली होती.