जळगाव - राज्यातील बहुचर्चित तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकुल घोटाळ्याचा निकाल आज (शनिवारी) धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाने जाहीर केला. त्यात शिवसेनेचे माजीमंत्री सुरेश जैन यांना ७ वर्षे शिक्षा तसेच १०० कोटी रुपयांचा दंड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री गुलाबराव देवकर यांना ५ वर्षे शिक्षा तर ५ लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
राज्यभरात गाजलेल्या तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकुल घोटाळ्यात आज (शनिवारी) धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाने माजी मंत्री सुरेश जैन, राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व ४८ संशयितांना दोषी ठरवले आहे. न्यायाधीश सृष्टी नीलकंठ यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. न्यायालयाने सुरुवातीला या घोटाळ्यातील मुख्य आरोपींना शिक्षा सुनावली. त्यानंतर ४८ पैकी एकेक आरोपीला शिक्षा सुनावली जात आहे. ही योजना राबवणारे बिल्डर जगन्नाथ वाणी यांना ७ वर्षे शिक्षा तर ४० कोटी रुपये दंड आणि तत्कालीन नगराध्यक्ष प्रदीप रायसोनी यांना ५ वर्षे शिक्षा तसेच १० लाख रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
दरम्यान, या निकालामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.