जळगाव - शहरातील मेहरूण भागात अनेक वर्षांपासून बंद असलेले धनाजीनाना टी.बी. सॅनेटोरियम रुग्णालय पुन्हा नव्याने सुरु करण्याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बुधवारी पालकमंत्र्यांनी महापालिकेत भेट दिली. यावेळी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी व मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यासह नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी पालकमंत्र्यांकडे टी.बी. रुग्णालयाची दुरुस्ती करण्याची मागणी केली. तर भविष्यात हे रुग्णालय जळगाकरांसह जिल्ह्यातील नागरिकांसाठी फायद्याचे ठरु शकते, असे सांगितले. यावर पालकमंत्र्यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करून, राज्य शासनाच्यावतीने सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले.
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपा कर्मचाऱ्यांसाठी दिलेले सॅनिटायझर व इतर साहित्य वाटप करण्यासाठी पालकमंत्र्यांनी महापालिकेत भेट दिली. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, शिवसेनेचे नगरसेवक अनंत जोशी, नितीन बरडे, प्रशांत नाईक, अमर जैन, मनोज चौधरी, गणेश सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी आयुक्तांच्या दालनात जावून पालकमंत्र्यांनी शहरातील स्थितीचा आढावा घेत, शहरात सर्वेक्षण सुरु ठेवण्याचा सूचना दिल्या.
१९९६ पासून रुग्णालय आहे बंद-
टी.बी.च्या रुग्णांच्या विलगीकरणासाठी हे रुग्णालय बांधण्यात आले होते. मात्र, १९९० नंतर टी.बी.चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर या रुग्णालयाचाही वापर कमी होवू लागला. १९९६ पासून हे रुग्णालय बंद असून, याठिकाणी ५२ क्वार्टर धुळखात पडले आहेत. महापालिकेच्या सर्व घंटागाड्या याठिकाणी थांबविल्या जातात. शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता क्वारंटाईन केलेल्यांसाठी या रुग्णालयात चांगली व्यवस्था करता आली असती. मात्र, या जागेबाबत मनपा प्रशासनाला गांभीर्य दिसून येत नाही.
सिव्हिलचा भोंगळ कारभार पालकमंत्र्यांनाही मान्य-
जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचे अनेक प्रकार समोर येत असताना, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील जिल्हा रुग्णालयात भोंगळ कारभार सुरु असल्याचे मान्य केले आहे. आयुक्तांच्या दालनात झालेल्या चर्चेत पालकमंत्र्यांनीही जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र, जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या कामांचे त्यांनी कौतुक केले. कोरोनाच्या समस्येनंतर जिल्हा रुग्णालय हे चांगल्या दर्जाचे रुग्णालय म्हणून समोर येईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील ४४ गावांमध्येच कोरोनाचा प्रादुर्भाव-
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ही संख्या शहरी भागात जास्त प्रमाणात आहे. जिल्ह्यातील १२५० गावांपैकी ४४ गावांमध्येच कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव असून, आता हा प्रादुर्भाव इतर गावात वाढू नये यावर उपाययोजना कराव्या लागणार असून, याबाबत लवकरच निर्णय घेतले जातील असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, पावसाळ्यात सर्पदंशो प्रकार घडत असतात. त्यातच जिल्हा रुग्णालय गोदावरी रुग्णालयात हलविल्यामुळे रुग्णांना काही प्रमाणात उपचार मिळण्यास उशीर होवू शकतो. अशा परिस्थितीत मनपा क्षेत्रातील शिवाजीनगर भागातील मनपा रुग्णालयात ओपीडी सुरु करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर सर्पदंश, कुत्र्यांचा चावा अशा रुग्णांवर उपचार करण्याचा सूचना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.