जळगाव - आयुष्याच्या उत्तरार्धात उदरनिर्वाहाची सोय व्हावी म्हणून पाचोरा, भडगाव तालुक्यांसह जिल्ह्यातील शेकडो नागरिकांनी मैत्रेय कंपनीत कष्टाचे पैसे गुंतवले. आज ही रक्कम मिळत नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. याप्रश्नी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून तोडगा काढावा, असे साकडे पाचोरा तालुका मानव संरक्षण समितीच्या वतीने आमदार किशोर पाटील यांना घालण्यात आले आहे.
मैत्रेय कंपनीच्या गुंतवणूकदारांच्या पैशांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पाचोरा तालुका मानव संरक्षण समितीच्या वतीने कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. याच अनुषंगाने, समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच स्थानिक आमदार किशोर पाटील यांची भेट घेऊन याप्रश्नी पाठपुरावा करण्याची विनंती केली. या शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष शशिकांत दुसाने, सचिव महेश कौंडिण्य, जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील, महिला उपाध्यक्षा किरण पाटील, पाचोरा तालुका महिला अध्यक्षा मंदाकिनी पाटील, कायदेशीर सल्लागार मानसिंग सिद्धू यांचा समावेश होता.
समितीचे अध्यक्ष शशिकांत दुसाने काय म्हणाले?
यावेळी समितीचे तालुकाध्यक्ष शशिकांत दुसाने यांनी चर्चेवेळी सांगितले की, मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे अनेक लोक आजारी पडले, काहींवर उपासमारीची वेळ आली. मात्र, या काळात गरीब गुंतवणुकदारांना या हक्काच्या पैशांचा काहीच उपयोग नाही. मैत्रेय कंपनी असोसिएशनमधील प्रतिनिधी व ग्राहक यांच्यात अनेकदा चर्चा झाली. मात्र, ग्राहकांची अडकलेली रक्कम अद्याप परत न मिळालेली नाही, अशी तक्रारही दुसाने यांनी केली.
समितीने व्यक्त केला खेद -
शासनाने या विषयाची दखल घेत मैत्रेय कंपनीची मालमत्ता शासनाकडे जमा केल्याचे आमदार किशोर पाटील यांनी यावेळी सांगितले. मात्र, असे असले तरी मैत्रेयच्या ग्राहकांना पैसे परत मिळत नाहीत, याबद्दल समितीचे अध्यक्ष दुसाने यांनी खेद व्यक्त केला. गरीब गुंतवणुकदारांना पैसे मिळवून द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तर हा विषय शासनाकडे पोहोचविला आहे. या विषयावर लवकरात लवकर मार्ग काढून गुंतवणूक दारांना न्याय देण्यात येईल, असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - वाटायला लागलं इथं लग्न आहे, की हे लगेच वाजा घेतात; गुलाबराव पाटलांचा रक्षा खडसेंवर हल्ला