जळगाव - येथे मजुराच्या मुलाने केलेल्या बेदम मारहाणीत बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी शहरातील वाघनगर परिसरात घडली. बाबुलाल फुलचंद सैनी (वय ५३, रा. रुख्मिनीनगर) असे मृत बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.
बांधकाम साईटवर मजुरांना पिण्यासाठी ठेवलेले पाणी उन्हामुळे गरम होते. हेच गरम पाणी मजुरांना प्यावे लागत असल्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाल्याने ही घटना घडली. घटना घडली तेव्हा बाबुलाल सैनी यांचा मुलगा ओमप्रकाश सैनी हा घटनास्थळी प्रत्यक्ष हजर होता. त्याने दिलेल्या माहितीनुसार, वाघ नगरातील त्यांच्या बांधकाम साईटवर विजय पाटील नामक मजूर कामाला होता. पिण्याच्या पाण्याचा माठ उन्हात असल्यामुळे मजुरांना गरम पाणी प्यावे लागते, या कारणावरून त्याने बाबुलाल सैनी यांच्याशी वाद घातला. वाद झाल्यानंतर आपण पुन्हा कामावर येणार नाही, असे सांगून तो निघून गेला होता. त्यानंतर सायंकाळी विजय पाटील याचा मुलगा बांधकाम साईटवर आला. त्याने मद्यधुंद अवस्थेत सैनी यांना लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. मारहाणीत पोटात, छातीला मार लागल्याने सैनी बेशुद्ध झाले. हे पाहून मारहाण करणारा तरुण पळून गेला.
त्यानंतर ओमप्रकाश व त्याचे काका जितेंद्रकुमार सैनी यांनी बाबुलाल यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सैनी यांना वैद्यकीय महाविद्यालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.