जळगाव - कौटुंबीक वादातून एका तरुणाने आपल्या वहिनीच्या डोक्यात कुर्हाडीने वार करत तिची निर्घृणपणे हत्या केली. ही धक्कादायक घटना आज (शुक्रवारी) रात्री शहरातील पिंप्राळा उपनगर परिसरातील मयूर कॉलनीत घडली आहे. योगिता मुकेश सोनार (वय ३९, रा. मयूर कॉलनी, जळगाव) असे हत्या झालेल्या महिलेचे तर दीपक लोटन सोनार (वय ३८, रा. मयूर कॉलनी, जळगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
काय आहे नेमकी घटना?
मृत योगिता सोनार या शहरातील मयूर कॉलनीत त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहत होत्या. १० महिन्यांपूर्वी त्यांचे पती मुकेश लोटन सोनार यांचे अपघाती निधन झाले होते. मुकेश यांच्या निधनानंतर काही दिवसांनी त्यांचे वडील लोटन सोनार यांचेही निधन झाले होते. दरम्यान, सोनार कुटुंबात या ना त्या कारणावरून सातत्याने वाद होत होते. आज (शुक्रवारी) अशाच प्रकारचा वाद योगिता आणि त्यांचा दीर दीपक सोनार यांच्यात झाला. यामुळे संतापलेल्या दीपकने वहिनी योगिता यांच्या डोक्यात कुर्हाडीने घाव घातले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. योगिता यांना ८ वर्षांचा मुलगा असल्याची माहिती मिळाली आहे.
संशयित दीपकला पोलिसांनी घेतले ताब्यात
ही घटना घडल्यानंतर संशयित आरोपी दीपकला रामानंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दीपक हा शहरातील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.