जळगाव - मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने पीक विमा योजनेच्या जुन्या निकषानुसार भरपाई द्यावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विमा काढलेला नाही, त्यांनाही सरसकट पंचनामे करून भरपाई दिली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मागील आठवड्यात झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची ते पाहणी करत आहेत. दौऱ्याला सुरुवात केल्यानंतर त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे शेतांमध्ये जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर ते बोलत होते.
पीक विम्याचे जुनेच निकष असावेत-
देवेंद्र फडणीस पुढे म्हणाले की, आमचे सरकार असताना आम्ही केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेचे निकष ठरवण्यासाठी दिवंगत आमदार हरिभाऊ जावळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने वातावरणाची स्थिती व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन पीक विमा योजनेचे निकष ठरवले होते. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महा विकास आघाडी सरकारने पीक विमा योजनेचे निकष बदलले. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी तर संपूर्ण हंगामात राज्य सरकारने पीक विमा योजनेसाठी टेंडर काढले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळू शकली नाही, असेही फडणवीस म्हणाले.
आपल्या चुका लपवण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवतात-
पीक विमा योजनेसाठी केंद्र सरकारने हिस्सा भरला नाही, म्हणून राज्य सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. आपल्या चुका लपवण्यासाठी वेळोवेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवणे चुकीचे आहे. पीक विमा योजनेसाठी राज्य सरकार निकष ठरवते. त्यानंतर टेंडर काढले जाते. त्याच वेळी केंद्र सरकार पीक विम्यासाठी आपल्या हिश्याची रक्कम जमा करते. राज्य सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवून आता सरसकट मदत करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना आता खराब केळी शेती बाहेर काढून नव्याने रोपणी करावी लागणार आहे. त्याचाही खर्च राज्य सरकारने करावा, अशीही मागणी त्यांनी केली.
करपा रोगासाठी औषधी द्यावी-
राज्यात आमचे सरकार असताना केळी पिकावर येणाऱ्या करपा रोगासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी औषधी दिली जात होती. परंतु, आता ती शेतकऱ्यांना मिळत नाही. राज्य सरकारने पूर्वीप्रमाणे करपा रोगासाठी औषधी द्यावी, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा - अभिनेता करण मेहराला अटक; पत्नीने केली होती तक्रार