जळगाव- जिल्ह्यातील जामनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस विक्रीसाठी आवश्यक असलेले टोकन घेण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली आहे. बाजार समिती प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नसल्याने हा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली होती.
हेही वाचा- लाॅकडाऊन: दिव्यांग करतोय एका पायाने 400 किमीचा प्रवास...
जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी कापूस खरेदीला प्रारंभ झाला आहे. सीसीआयच्या केंद्रांवर कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी उसळू शकते, ही शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने प्रत्येक शेतकऱ्याला टोकन देण्याचे निर्देश कृषी उत्पन्न बाजार समित्यांना दिले आहेत. त्या अनुषंगाने सोमवारी टोकन घेण्यासाठी जामनेर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी बाजार समितीत एकच गर्दी केली होती. ही गर्दी कमी करताना बाजार समिती प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागली. नंतर शेतकऱ्यांना एका ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग राखत खुर्च्यांवर बसविण्यात आले. मोजक्या शेतकऱ्यांना आत प्रवेश दिला जात होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ताटकळत उभे रहावे लागले. अनेक शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली.
शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल कापूस पडून
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडे अजूनही हजारो क्विंटल कापूस पडून आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्याने मध्यंतरी कापूस खरेदी थांबली होती. कापसाची आयात-निर्यात देखील थांबल्याने खासगी जिनिंग चालकांनी तसेच राज्य सरकारने कापूस खरेदी बंद केली होती. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. खरीप हंगाम तोंडावर आल्याने हाती पैसे यावेत, खरिपाची तयारी करता यावी म्हणून कापूस खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन जळगाव जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू झाली आहे.