जळगाव - जिल्ह्यात गेल्या पंधरवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 30 हजार हेक्टरवरील उडीद आणि मुगाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले पीक अक्षरश: सडून गेले. त्यामुळे बळीराजावर आभाळ कोसळले आहे. उडदाचे सुमारे साडेबारा ते तेरा हजार हेक्टर, तर मुगाचे 16 ते 17 हजार हेक्टर खराब झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बहुसंख्य भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असताना कृषी विभागाला नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यासाठी मुहूर्त मिळत नसल्याची स्थिती आहे.
गेल्या काही वर्षांपासून बळीराजावर आलेले अस्मानी संकट दूर होताना दिसून येत नाही. यावर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे धरणे, नद्या ओसंडून वाहत असले तरी संपूर्ण खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. उडीद आणि मुगाचे मोठे क्षेत्र पूर्णपणे वाया गेले असून, अनेक शेतकऱ्यांवर आता उभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आली आहे.
आठवडा उलटला तरी पंचनामे नाही -
जिल्ह्यात मूग, उडीदाचे प्रचंड नुकसान झाल्यानंतर गेल्या आठवड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशावरून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले होते. मात्र, आठवडा उलटल्यानंतरही कृषी विभागाकडून पंचनाम्यांना सुरुवात झालेली नाही. अनेक शेतकऱ्यांनी मूगावर ट्रॅक्टर फिरवून शेत तयार केले आहे, तर अनेकांनी अजून पाऊस झाल्यास खराब होण्यापेक्षा आहे त्या स्थितीतील मूग, उडीद काढून घेतले आहे. अशा परिस्थितीत कृषी विभागाकडून पंचनामे केव्हा केले जातील, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
पेरण्यांच्या वेळेस अनेक भागात सोयाबीनचे पीक उतरलेच नसल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आता ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक उगवले अशा शेतकऱ्यांच्या सोयाबीनला अजूनही शेंगा लागलेल्या नाहीत.
जिल्ह्यातील नुकसानीची आकडेवारी -
मूग | उडीद | |
तालुका | बाधित क्षेत्र (हेक्टर) | बाधित क्षेत्र (हेक्टर) |
जळगाव | 2539 | 5398 |
भुसावळ | 145 | 47 |
बोदवड | 447 | 356 |
यावल | 1580 | 1642 |
रावेर | 16 | 50 |
मुक्ताईनगर | 422 | 462 |
अमळनेर | 1952 | 616 |
चोपडा | 3901 | 1536 |
एरंडोल | 3079 | 728 |
धरणगाव | 1890 | 1352 |
पारोळा | 492 | 209 |
पाचोरा | 202 | 183 |
भडगाव | 75 | 55 |