जळगाव- जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी शुक्रवारी सकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आधीच कोरोना विषाणूच्या संकटाने सर्वत्र हाहाकार माजवला असताना, आलेल्या अवकाळी पावसाच्या संकटामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.
हेही वाचा- धक्कादायक ! कोरोनोचा असाही बळी.. जिल्हाबंदीसाठी खोदला रस्ता, उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू
गुरुवारी सायंकाळपासूनच जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. जळगाव शहरात देखील रात्रीच्या वेळी हलकासा पाऊस झाला. त्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. उशिरापर्यंत सूर्यदर्शन झालेच नाही. सकाळी साडेदहा वाजेनंतर जळगावात पावसाला सुरुवात झाली. एक ते सव्वा तास पाऊस सुरू होता.
जिल्ह्यातील भुसावळ, मुक्ताईनगर, जामनेर, यावल, रावेर तसेच पाचोरा, भडगाव, अमळनेर, धरणगाव, चोपडा तालुक्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात आठवडाभरात सलग दुसऱ्यांदा आलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कापणीवर आलेली पिके पावसामुळे खराब झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी गहू कापून शेतातच ठेवलेला होता. पावसामुळे गव्हाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे वादळामुळे मक्याचे पीक जमिनीवर आडवे पडल्याने नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यात अडचणी येणार असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.