जळगाव - शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात पुन्हा कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.23) महापौर भारती सोनवणे यांनी अचानक भेट देत पाहणी केली. डॉक्टर आणि रुग्णांशी चर्चा करून महापौरांनी आढावा घेतला.
महापौरांनी केली डॉक्टरांशी चर्चा
जळगाव शहरात आणि जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात वाढत आहेत. रुग्णांना उपचारार्थ दाखल करून घेण्यासाठी मनपाचे कोविड केअर सेंटर पुन्हा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू करण्यात आले आहे. संपूर्ण इमारतींची साफसफाई करून विद्युत दुरुस्ती करण्यात आली असून सुरक्षारक्षकांची देखील नेमणूक केलेली आहे. महापौर भारती सोनवणे यांनी रुग्ण आणि डॉक्टरांशी प्रत्यक्षात चर्चा केली असता कोणत्याही रुग्णाला गंभीर त्रास नसून औषधोपचार सुरू असल्याचे सांगितले.
कोविड सेंटरमध्ये 670रुग्णांची व्यवस्था
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात महापालिकेने कोविड सेंटर सुरू केले असून त्याठिकाणी 670 रुग्ण उपचार घेतील, अशी व्यवस्था आहे. एका इमारतीमध्ये स्वॅब घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांची शक्यतो आरटीपीसीआर चाचणी केली जात असून एखादा गंभीर रुग्ण असेल तर त्यांची अँटीजन टेस्ट केली जात आहे.
हेही वाचा - जळगावात भरदिवसा घरफोडी; 84 हजारांचा ऐवज लंपास