जळगाव - येथील महापालिकेत अनेक प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू असल्याच्या तक्रारी काही नगरसेवकांमार्फत माझ्यापर्यंत आल्या आहेत. त्यांची कागदपत्रेही माझ्याकडे आहेत. सर्व कागदपत्रांचा सविस्तर अभ्यास सुरू असून, त्यात काही तथ्य निघाले तर आपण स्वतः राज्य सरकारकडे कारवाईची मागणी करू, अशी माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे माहिती देताना रविवारी दुपारी एकनाथ खडसे हे व्यक्तिगत कामानिमित्त जळगावात आले होते. यावेळी आपल्या मुक्ताई निवासस्थानी पत्रकारांसोबत ते बोलत होते. खडसे पुढे म्हणाले, जळगाव महापालिकेत अनेक प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू असल्याच्या तक्रारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी माझ्याकडे केल्या आहेत. विशेष करून, नाशिकच्या वॉटर ग्रेस कंपनीला देण्यात आलेल्या शहराच्या स्वच्छतेच्या ठेक्यात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी सुरू असून, त्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आहे. या विषयासंदर्भात शिवसेनेचे नगरसेवक तथा स्थायी समितीचे सदस्य प्रशांत नाईक यांनी आपल्याला काही कागदपत्रे दिली आहेत. या कागदपत्रांचा अभ्यास सुरू आहे. त्यात काही तथ्य निघाले तर संबंधित अधिकारी तसेच भ्रष्टाचाराला पाठिंबा देणार्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आपण स्वतः राज्य सरकारकडे पाठपुरावा करू, असे खडसे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, महापालिकेची निगडित काही प्रकरणांची चौकशी करण्याची आपण मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात-जळगावकर नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, असे आपले मत आहे. महापालिका निवडणुकीच्या वेळेस मी भाजपकडून प्रचारात नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा मिळण्यासंदर्भात आश्वासन दिले होते. त्यानंतरही नागरिकांना सोयी सुविधा मिळत नसल्याने आपण महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्यास सांगितले होते. आताही तीच परिस्थिती असल्याने मी नागरिकांच्या बाजूने आहे, असे खडसे म्हणाले.
'त्या' प्रकरणाचा विचार होणे गरजेचे-शहरातील भाजपचे जिल्हा कार्यालय एका माथेफिरूने जाळण्याचा प्रयत्न केला. या विषयासंदर्भात पत्रकारांनी एकनाथ खडसे यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की हा प्रकार एका माथेफिरूने केल्याचे आपण ऐकले. काही दिवसांपूर्वी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीवेळी देखील या माथेफिरूने शिवीगाळ करत दगडफेक केल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता पुन्हा याच माथेफिरूने हे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या बाबतीत हा प्रकार सातत्याने का घडत आहे? हा संशोधनाचा विषय आहे. त्यावर विचार करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेवर राज्यपालांमार्फत नियुक्त करण्यासाठी सादर केलेल्या 12 उमेदवारांच्या यादी संदर्भात मत व्यक्त करणे टाळले.
केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा -
जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील केळी उत्पादक संकटात सापडले आहेत. केळी पीक विम्याच्या निकषांबाबत वाद सुरू असल्याने केळी उत्पादक हवालदिल झाले आहेत. आधीच नैसर्गिक संकटाने केळी उत्पादक संकटात सापडलेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आपण करणार असल्याचेही खडसे यांनी सांगितले.