जळगाव - कोरोनाच्या लसींचा साठा संपल्याने जळगाव जिल्ह्यातील बहुतांश केंद्रांवर पुन्हा एकदा लसीकरणाची प्रक्रिया ठप्प झाली आहे. लसीकरण थांबण्याची ही महिनाभरातील दुसरी वेळ आहे. सोमवारी जळगाव महापालिका कार्यक्षेत्रातील अनेक लसीकरण केंद्रांवरून नागरिकांना लस न घेताच परत जाण्याची वेळ आली. त्यामुळे अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एकीकडे राज्य शासन लसीकरणाची टक्केवारी वाढवण्याचे आवाहन करत असताना दुसरीकडे अशा प्रकारे नागरिकांना लसीपासून वंचित राहावे लागत असल्याची शोकांतिका आहे.
आता साडेनऊ हजार डोस मिळणार -
गेल्या आठवड्यात जिल्ह्यासाठी ४० हजार डोस प्राप्त झाले होते. त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच १३३ केंद्रांवर लसीकरण सुरू झाले होते. मात्र, अवघ्या ४ ते ५ दिवसातच काही केंद्रांवरील हे डोस संपल्याने त्या ठिकाणचे लसीकरण बंद आहे. ज्या केंद्रांवर डोस उपलब्ध आहेत, त्याच केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसात जिल्ह्यासाठी कोविशिल्ड व को-व्हॅक्सिन लसीचे ९ हजार ४२० डोस प्राप्त होणार आहेत. ज्या केंद्रांवर डोस नाहीत. त्या केंद्रांवर मागणीनुसार हे डोस दिले जाणार आहे. जिल्ह्यात लसीकरणाने वेग पकडला असून ४५ वर्षांवरील नागरिकांचा लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे. असे असताना लसींचा अपेक्षित पुरवठा होत नसल्याने टक्केवारीवर परिणाम झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात दुसऱ्यांदा लसीकरणाची प्रक्रिया ठप्प शनिवारपासून मंदावली लसीकरणाची प्रक्रिया -जळगाव शहरात महापालिका प्रशासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. आरोग्य केंद्रांवरही लस दिली जात आहे. मात्र, लसींचे डोस संपत आल्याने शनिवारपासून लसीकरणाची प्रक्रिया मंदावली होती. आरोग्य केंद्रांमध्ये शनिवारी फक्त ४३५ जणांना लस देण्यात आली होती. सोमवारी तर जवळपास सर्वच केंद्रांवर लसीकरण थांबले होते.
जिल्ह्यासाठी लसींचा मोठा साठा आवश्यक -
गेल्या आठवड्यात ४० हजार डोस प्राप्त झाल्यानंतर दिवसाला सरासरी ८ हजारांपर्यंत लसीकरण होत होते. हे डोस कमी झाल्याने लसीकरणाची आकडेवारीही कमी झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एकूण १४ लाखांपर्यंत नागरिक ४५ वर्षांवरील असल्याने त्या तुलनेत मोठ्या प्रमाणात लसीचे डोस आवश्यक असणार आहे. आता लसींचे साडेनऊ हजार डोस मिळणार आहेत. पण ते २ ते ३ दिवसात संपतील. त्यानंतर वेळीच डोस उपलब्ध झाले नाहीत तर पुन्हा लसीकरण थांबवावे लागेल.
ज्येष्ठ नागरिकांचे हाल-
महापालिकेच्या शाहू रुग्णालयासह इतर आरोग्य केंद्रांवर सोमवारी सकाळपासून अनेक नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी केली होती. परंतु, लसींचे डोस शिल्लक नसल्याने त्यांना घरी परत जाण्यास सांगितले गेले. अनेक नागरिक दुपारपर्यंत लस मिळेल, या अपेक्षेने केंद्रांवर थांबून होते. त्यामुळे नागरिकांचे विशेषकरून ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले. अनेकांनी आपल्याला रिक्षा भाड्याचा नाहक भुर्दंड बसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.