जळगाव - राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे जळगाव विमानतळावर परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचणीसाठीची यंत्रणा उभारण्यात आली आहे. आज पहिल्याच दिवशी अहमदाबाद येथून आलेल्या १९ पैकी १२ प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. तसेच त्यांना चाचणीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत जेथे आहेत, तेथेच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन सतर्क झाले आहे. ज्या राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्या चार राज्यातील प्रवाशांसाठी महाराष्ट्रात येताना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. याबाबतचे निर्देश सर्व जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने जळगाव विमानतळावर देखील प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. ज्या प्रवाशांनी कोरोना चाचणी करुन घेतलेली नाही, त्या प्रवाशांची चाचणी करण्यासाठी जळगाव विमानतळावर यंत्रणा उभारण्यात आली आहे.
५ प्रवाशांनी आधीच केली होती चाचणी-
आज पहिल्याच दिवशी जळगाव विमानतळावर अहमदाबाद येथून आलेल्या १९ प्रवाशांना थांबवण्यात आले. यातील ५ प्रवाशांकडे कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचे अहवाल असल्याने त्यांना जाऊ देण्यात आले. दोन बालक असल्याने त्यांची चाचणी करण्यात आली नाही. मात्र, उर्वरित १२ प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली.
रेल्वे स्थानकावरही तपासणी होणार-
बुधवारी मध्यरात्रीपासून जळगाव रेल्वेस्थानकावर देखील रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी यंत्रणा लावण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. गुरुवारी सकाळपासून रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या चाचणीला सुरुवात होणार आहे.
हेही वाचा- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर