जळगाव - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सकाळी भाजीपाला लिलावाप्रसंगी प्रचंड गर्दी उसळली होती. एकाच वेळी हजारो नागरिक एकत्र आल्याने 'सोशल डिस्टन्सिंग'ला हरताळ फासला गेला. अशा प्रकारे गर्दी झाल्याने कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावण्याची भीती आहे. परंतु, नागरिकांना कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळाले. धक्कादायक बाब म्हणजे, बाजार समिती तसेच जिल्हा प्रशासनाने याठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून कोणत्याही प्रकारचे नियोजन केलेले नाही. त्यामुळे दररोज अशी गर्दी होत आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहे. भाजीपाला तसेच कृषी माल अत्यावश्यक बाब असल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे दैनंदिन काम नियमितपणे सुरू आहे. बाजार समितीत दररोज सकाळी 6 वाजेपासून भाजीपाल्याचा लिलाव होतो. त्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. बुधवारी सकाळी बाजार समितीत हजारो शेतकरी, व्यापारी, अडते तसेच किरकोळ विक्रेते एकत्र आले होते. 'सोशल डिस्टन्सिंग'चा कोणत्याही प्रकारचा नियम न पाळता लिलाव सुरू होता. अशा बेफिकिरीमुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावण्याची भीती वर्तवली जात आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, बाजार समितीत लिलावावेळी लोकांची दररोज मोठी गर्दी होत आहे. शेतकरी, व्यापारी तसेच किरकोळ विक्रेते तोंडाला मास्क लावत नाहीत. एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखत नाहीत. मात्र, प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नाहीत. बुधवारी तर बाजार समितीत हजारो वाहने देखील आली होती. त्यामुळे बाजार समिती समोरच वाहतूककोंडी झाली होती.